येत्या १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. कारण हार्दिक पंड्या हा असा खेळाडू आहे, जो एकट्याच्या बळावर भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो.
परंतु, हार्दिक पंड्याची निराशाजनक कामगिरी अशीच सुरू राहिली, तर त्याला आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान, या संघात असा एक खेळाडू आहे, जो टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याची जागा घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार भारतीय संघ १० ऑक्टोबरपर्यंत टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात बदल करू शकतो.
कोरोनानंतर सुरू झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला सुरुवातीचे काही सामने खेळण्याची संधी दिली नव्हती. त्यानंतर काही सामन्यात त्याला संधी मिळाली होती, परंतु तो गोलंदाजी करताना दिसून आला नव्हता. तसेच फलंदाजीमध्ये ही त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
हार्दिक पंड्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमध्ये गोलंदाजी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण काही महिन्यांपूर्वी त्याला पाठीची दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्यानंतर जेव्हा त्याने पुनरागमन केले होते, त्यावेळी तो फलंदाज म्हणून संघात समाविष्ट झाला होता. परंतु, जर त्याला टी२० संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला गोलंदाजी देखील करावी लागेल.
हा खेळाडू करू शकतो हार्दिकचा पत्ता कट
हार्दिक पंड्या जर फॉर्ममध्ये नसेल तर त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. त्याची आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
जर हार्दिक पंड्या संघाबाहेर झाला तर, शार्दुल ठाकूर त्याची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत २ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ३ डावात ३९.०० च्या सरासरीने ११७ धावा केल्या होत्या. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तोडफोड फलंदाजी! नितीश राणाच्या त्या शॉटने तोडली कॅमेराची लेन्स, पाहा व्हिडिओ
बाबो! काही तासांत विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे
हैदराबादविरुद्ध अवघ्या १८ धावा करताच दिनेश कार्तिकच्या नावे झाली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद