भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली आहे. ब्रिस्बेन येथील शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात शार्दुल ठाकुर याने आपल्या अष्टपैलू खेळाने भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच शार्दुलची प्रतिक्रिया समोर येत असून त्याने शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचे माजी खेळाडू वसीम जाफर यांच्याशी चर्चा केली असल्याचे स्पष्ट केले.
एका मुलाखतीदरम्यान शार्दुल म्हणाला, “मी ब्रिस्बेन कसोटी सामन्यादरम्यान वसीम यांच्याशी कायम संभाषण करत होतो. कारण वसीम यांनी मला शाळेच्या दिवसांपासून खेळताना बघितले आहे. ते माझ्या खेळाला पूर्णपणे ओळखतात. त्यांनी मला सांगितले की दुसर्या डावात गोलंदाजी करताना 5 बळी मिळवण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेव. कारण पहिल्या डावामध्ये तू उत्तम गोलंदाजी केली आहे. वसीम यांनी माझ्या फलंदाजीबद्दल देखील माझे कौतुक केले होते.”
शार्दुलने केली उत्कृष्ट कामगिरी
प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शार्दुलला ब्रिस्बेन कसोटी सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. शार्दुलने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अष्टपैलू कामगिरी केली. शार्दुलने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 3 प्रमुख फलंदाजांना बाद केले. तसेच भारताच्या पहिल्या डावात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
पहिल्या डावात भारताकडून शार्दुलने 115 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांची शानदार खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातदेखील आपला शानदार फॉर्म कायम ठेवत शार्दुलने 4 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गारद केले होते. शार्दुलच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघाला आगामी काळात एक महत्त्वाचा खेळाडू मिळाला असल्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडणारा इंग्लंडचा खेळाडू करू शकतो टीम इंडियाला चितपट!
“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना