यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकली नाही. सीएसकेला प्लेऑफमध्येही स्थान मिळाले नाही. याच कारणास्तव शेवटच्या काही सामन्यांमध्ये सीएसकेच्या काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या युवा खेळाडूंपैकीच एक म्हणजे प्रशांत सोलंकी. सोलंकी त्याच्यावर संघाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला आहे. आता त्याने स्वतः खुलासा केला आहे की, कोणत्या खेळाडूच्या शिफारीमुळे त्याला सीएसकेमध्ये संधी मिळाली होती.
प्रशांत सोलंकी (Prashant Solanki) याआधी विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये चर्चेत आला होता. त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे त्याच्या संघाला ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप मदत झाली होती. त्याने हंगामातील ६ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या होत्या. मुंबई संघासाठी त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहिल्यानंतर त्याचा सहकारी खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने, आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जकडे त्याला संघात घेण्यासाठी शिफारस केली होती. शार्दुल मागच्या हंगामापर्यंत सीएसकेचा खेळाडू होता.
सीएसकेने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच युएईला रवाना होताना सोलंकीला नेट गोलंदाजाच्या रूपात सहभागी केले होते. आयपीएललमध्ये सीएसकेच्या ताफ्यात संधी मिळण्याविषयी तो म्हणाला की, “त्यावर्षी शार्दुल भाई सीएसकेसाठी खेळत होता. तो विजय हजारेचे दोन सामने खेळत होता. त्याने मला गोलंदाजी करताना पाहिले आणि सीएसकेच्या व्यवस्थापनाकडे माझ्या नावाची शिफारस केली. एका महिन्यानंतर दुबईमध्ये (यूएई) आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होणार होता. त्यामुले सीएसकेच्या व्हिडिओ एनालिस्टने माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, मला नेट गोलंदाजच्या रूपात यायला आवडेल का? आणि मी लगेच हो म्हणालो.”