fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रोहित शर्माने फक्त विश्वविक्रमच केले नाही तर आयसीसी क्रमवारीतही केलायं हा मोठा पराक्रम

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना रविवारी(६ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात भारताने २०३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर सोमवारी(७ ऑक्टोबर) आयसीसीने कसोटी क्रमवारी घोषित केली आहे.

या क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मोठी गरुड झेप घेतली आहे. रोहितने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. त्याने ३६ स्थानांनी उडी घेत १७ वे स्थान मिळवले आहे.

रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला पहिल्या कसोटीचा सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

रोहितबरोबरच या क्रमवारीत मयंक अगरवालनेही कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. त्याने ३८ स्थानांची झेप घेत २५ वे स्थान मिळवले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली होती.

याबरोबरच रविंद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम ५२४ गुण मिळवताना २ स्थानांची प्रगती केली आहे. तो आता फलंदाजी क्रमवारीत ५२ व्या स्थानावर आला आहे.

तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम असला तरी मात्र त्याचे गुण कमी झाले आहेत. आता तो ९०० गुणांच्या खाली आला असून तो ८९९ गुणांवर घसरला आहे. त्यामुळे त्याच्यात आणि अव्वल क्रमांकावर असलेल्या स्टिव्ह स्मिथच्या गुणांमधील अंतर ३८ गुणांचे झाले आहे.

त्याचबरोबर गोलंदाजांच्या क्रमवारीत आर अश्विनने पुन्हा एकदा पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत एकूण ८ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच यातील ७ विकेट्स त्याने पहिल्या डावात घेतल्या होत्या. तो आता ४ स्थानांची प्रगती करत १० व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवले आहेत. त्याचे आता ७१० गुण झाले आहेत. तसेच त्याने १८ व्या स्थानावरुन १६ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या ५ जणांमध्ये भारताचे रविंद्र जडेजा आणि आर अश्विन आहेत. जडेजाने बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर अश्विनने १ स्थानाने वर येत ५ वा क्रमांक मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंपैकी क्विंटॉन डीकॉक आणि डीन एल्गारने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. डीकॉकने पहिल्या १० फलंदाजामध्ये पुनरागमन केले आहे. तो आता ४ स्थानांची उडी घेत ७ व्या क्रमांकावर आला आहे. तसेच एल्गार ५ स्थानांची झेप घेत १४ व्या स्थानावर आला आहे.

डीकॉक आणि एल्गारने भारताविरुद्ध पहिल्या डावात शतकी खेळी केल्या होत्या. डीकॉकने १११ धावांची तर एल्गारने १६० धावांची खेळी केली होती.

You might also like