संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवांमुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या मार्ग खडतर झाला आहे. भारताच्या या पराभवानंतर अनेक दिग्गज आपली प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी देखील ट्विट करत भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारला आहे.
थरूर यांनी केले असे ट्विट
एक क्रिकेटप्रेमी म्हणून ज्ञात असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर ट्विट केले. यामध्ये त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरळ प्रश्न केला. त्यांनी लिहिले,
‘आपण आत्तापर्यंत त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना सन्मानित ही केले आहे. पराभवाचे आम्हाला काही वाटत नाही. मात्र, त्यांनी त्यांचा नीट मुकाबला ही केला नाही. कर्णधाराला आम्हाला हे सांगण्याची गरज नाही की, काय चुकीचे झाले? कारण आम्ही ते पाहिले आहे. मात्र, त्याने आम्हाला हे सांगावे कसे झाले?’
शशी थरूर हे यापूर्वी २०११ मध्ये आयपीएलच्या कोची टस्कर्स केरला या संघाचे संघमालक होते.
We have adored them, applauded them, admired them & awarded them. We don't mind their losing but we do mind their not even putting up a fight. The captain needn't tell us what went wrong (we could see that for ourselves); he needs to tell us WHY!:https://t.co/G4xNxt9N4T
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 1, 2021
भारताचे सलग दोन पराभव
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला स्पर्धेच्या सुरुवातीला सलग दोन पराभव स्वीकारावे लागेल. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतीय संघाला १० धावांनी लोळवत पहिला विश्वचषक विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुन्हा एकदा ८ गड्यांनी पराभूत झाला. भारतीय संघाला स्पर्धेतील आपले आव्हान टिकवायचे असल्यास उर्वरित तीन सामन्यात मोठे विजय साजरे करावे लागतील. तसेच इतर संघांच्या कामगिरीकडे देखील त्यांना लक्ष ठेवावे लागेल.
भारतीय संघाला या टी२० विश्वचषकात आणखी तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबुधाबी येथे, ५ नोव्हेंबर रोजी नामिबिया व ८ नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडशी दुबई येथे भारताचा सामना होईल. या तीनही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, भारताला इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’