भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तीन दिवसाचा खेळ समाप्त झाला असून, सामना अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे. त्याचवेळी या सामन्यात शानदार शतक झळकावलेला ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याचे ऑस्ट्रेलियन दिग्गजाने तोंडभरून कौतुक केले आहे.
केवळ 23 वर्षांचा असलेला ग्रीन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दुखापतीमुळे तो सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर इंदोर कसोटीत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, अहमदाबाद कसोटी त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ हे अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर त्याने उस्मान ख्वाजासह ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 208 धावांची भागीदारी केली. ग्रीनने 170 चेंडूंचा सामना करताना 18 चौकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक ठरले.
त्याच्या या खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट याने त्याचे कौतुक केले. टेट म्हणाला,
“ज्यावेळी त्याने शतक पूर्ण केले तेव्हा त्याला आनंद झाला. मात्र, त्यापेक्षा त्याला या खेळीचे समाधान होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या आगमनाची घोषणा केली. तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी देखील करतो. 140 पेक्षा जास्तच्या वेगाने गोलंदाजी देखील करण्याची त्याची क्षमता आहे. याशिवाय तो स्लिपमध्ये उभा राहून चांगले झेल देखील घेतो. या सर्वामुळे मला त्याच्यामध्ये महान जॅक कॅलिसची झलक दिसते.”
ग्रीन हा मागील वर्षी भारत दौऱ्यापासून चांगला चर्चेत आला होता. टी20 मालिकेत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर तब्बल 17.50 कोटींची तगडी बोली लावली होती.
(Shaun Tait Said Cameron Green Skils Like Veteran Jaques Kallis)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल