भारतीय संघाने शुक्रवारी (२२ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकला. उभय संघातील एकदिवसीय मालिका त्रिनिदादमध्ये खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मालिकेत त्यांचा संघ ०-१ अशा पिछाडीवर पडला आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय कर्णधार शिखर धवनने महत्वपूर्ण प्रदर्शन केले आणि एक खास विक्रमही नावावर केला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा विश्रांतीवर असल्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यात धवनने ९९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची खेळी केली. या प्रदर्शानानंतर धवन भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचे माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या नावावर होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक करणाऱ्या सर्वात वयस्कर कर्णधारांमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. धवनने ही कामगिरी वेस्ट इंडीविरुद्धच्या पहिल्या एकदिवसयी सामन्यात केली. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात धवनचे वय ३६ वर्ष आणि २२९ दिवस होते. दुसऱ्या क्रमांकावर अजहरुद्दीन आहेत, ज्यांनी १९९९ मध्ये ही कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज सुनील गावसकर आहेत, ज्यांनी १९८५ मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर नाव येते ते एमएस धोनीचे. धोनीचे २०१६ मध्ये शेवटचे एकदिवसीय अर्धशतक केले होते. त्यानंतर नाव येते रोहित शर्माचे, ज्याने चालू वर्षात ही कामगिरी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक करणारे सर्वात वयस्कर कर्णधार –
३६ वर्ष २२९ दिवस – शिखर धवन (२०२२)
३६ वर्ष १२० दिवस – मोहम्मद अजहरुद्दिन (१९९९)
३५ वर्ष २२५ दिवस – सुनील गावसकर (१९८५)
३५ वर्ष १०८ दिवस – एमएस धोनी (२०१६)
३५ वर्ष ७३ दिवस – रोहित शर्मा (२०२२)
दरम्यान, उभय संघात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी सलामीवीर जोडी शिखर धवन आणि शुबमन गिल (६४) यांनी पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी पार पाडली. तसेच श्रेयस अय्यरने (५४) देखील अर्धशतक केले आणि खेळाडूंच्या या प्रदर्शनामुळेच भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजनेही शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचा संघ ५० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर त्यांना ३०५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सचिनवर भारी पडला युवा शुबमन गिल, वेस्ट इंडीजमध्ये करून दाखवला ‘हा’ पराक्रम
WIvsIND: तेच मैदान, तोच धवन! वेस्ट इंडिजमध्ये सलामीला शतकी भागीदारी ठोकण्यात ठरतोय ‘गब्बर’
तुफानी अर्धशतकासह श्रेयस दिग्गजांच्या पंक्तीत; फोडून काढली कॅरेबियन गोलंदाजी