पंधराव्या आयपीएल हंगामाचा शेवटचा साखळी सामना रविवारी (२२ मे) सनरायजर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनीही दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये शिखर धवनला स्थान मिळाले नसले तरीही त्याने हैद्राबाद विरुद्ध चांगली फलंदाजी करत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे खेळला गेलेला हा सामना पंजाबने पाच विकेट्सने जिंकला. या सामन्यात धवनने ३२ चेंडूमध्ये २ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. यावेळी तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ७०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. हा विक्रम त्याने या सामन्यातील पहिला चौकार मारत आपल्या नावे केला आहे.
तसेच आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याच फलंदाजाने ६०० पेक्षा अधिक चौकार लगावले नाहीत. यामुळे धवनचा हा विक्रम विशेषच म्हणावा लागेल. धवननंतर आयपीलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेविड वॉर्नर ५७७ चौकारासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली ५७६ चौकारासह आणि रोहित शर्मा ५१९ चौकारसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याबरोबर मिस्टर आयपीएल अर्थातच सुरेश रैनाने ५०६ चौकार मारले आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे पार पडलेल्या या आयपीएल हंगामात धवनने उत्तम फलंदाजी केली आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ४६० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
शिखर धवनवर दुर्लक्ष
दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारतीय संघ घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेत धवनला संघात स्थान मिळाले नाही. त्याची सध्याची कामगिरी पाहता त्याला संघात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचबरोबर तो संघाचे नेतृत्वही करेल अशी चर्चा होत होती.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहूलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर विकेटकीपर रिषभ पंतची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच इंग्लंडच्या अर्धवट राहिलेल्या दौऱ्यातील पाचव्या कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजाराचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्रिकेट इथेच संपत नाही, मला फॉर्ममध्ये येण्यासाठी…’ आयपीएलमधील खराब कामगिरीबद्दल रोहितचे मोठे भाष्य
बापरे! उमरान मलिकचा वेगवान चेंडू आदळला थेट मयंकच्या बरगड्यांवर, सामनाही थांबला





