श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार शिखर धवन आणि पदार्पणवीर इशान किशनने अर्धशतके झळकावली. नाबाद खेळी करणाऱ्या शिखरने यादरम्यान कारकीर्दीतील मैलाचा दगड पार केला.
शिखरची धमाकेदार खेळी
नियमित कर्णधार विराट कोहली वरिष्ठ संघासह इंग्लंडमध्ये असल्याने शिखर धवन प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नेतृत्वाच्या या पहिल्याच परीक्षेत तो पूर्ण गुणांनी पास झाला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने एक बाजू लावून धरत नाबाद ८६ धावांची खेळी केली. यामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विजयी धावदेखील त्याच्याच बॅटमधून निघाली.
अनेक विक्रम केले आपल्या नावे
शिखरने आपल्या नाबाद खेळी दरम्यान अनेक विक्रम आपल्या नावे केले. २३ धावा करताच त्याने वनडे क्रिकेटमधील ६००० धावांचा टप्पा गाठला होता. या व्यतिरिक्त शिखर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून १०,००० धावा जमवणारा अवघा पाचवा सलामीवीर बनला. धवनने २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना आत्तापर्यंत १०,०५१ धावा जमविल्या.
यांनी केली अशी कामगिरी
शिखर धवनपूर्वी अशी कामगिरी केवळ चार भारतीय सलामीवीरांना करता आली आहे. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून सर्वप्रथम १०,००० धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर व भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे.
भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
वीरेंद्र सेहवाग- १५,७५८
सचिन तेंडुलकर- १५,३३५
सुनील गावसकर- १२,२५८
रोहित शर्मा- १०,७३६
शिखर धवन- १०,०५१
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! बटलरचे धमाकेदार पुनरागमन, मोईन अलीने दाखवला अष्टपैलू खेळ
‘कर्णधार’ धवन पहिल्या वनडेत चमकला! वाडेकर, तेंडुलकर सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील
खेळाडू, कर्णधार म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही पहिल्या वनडेत द्रविडच्या पारड्यात विजयच