कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची वनडे मालिका रविवारपासून (१८ जुलै) सुरु होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने आर प्रेमादासा स्टेडियमवर पार पडणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद सांभाळताना दिसेल. तसेच या मालिकेतील पहिल्याच सामन्यात शिखरकडे काही खास विक्रम करण्याची संधी असणार आहे.
गांगुलीला टाकू शकतो मागे
शिखरने त्याच्या कारकिर्दीत वनडेत आत्तापर्यंत १४२ सामन्यांतील १३९ डावात ५९७७ धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध त्याने २३ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो ६००० वनडे धावांचा टप्पा पार करेल. असा कारनामा करणारा तो १० भारतीय क्रिकेटपटू ठरेल.
याशिवाय तो सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. सध्या वनडेत सर्वात जलद ६००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट (१३६ डाव) अव्वल क्रमांकावर आहे. तर गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीला ६००० वनडे धावा करण्यासाठी १४७ डाव लागले होते.
तसेच जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये चौथा क्रमांक मिळवण्याची शिखरला संधी आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर हाशिम अमला (१२३ डाव), दुसऱ्या क्रमांकावर विराट (१३६ डाव) आणि तिसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन (१३९ डाव) आहेत.
सर्वात वयस्कर कर्णधार
शिखर जेव्हा श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे कर्णधार म्हणून उतरेल, तेव्हा तो भारताचा कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरेल. पहिल्या वनडे सामन्यावेळी त्याचे वय ३५ वर्षे २२५ दिवस असेल. तसेच शिखर भारताचा एकूण ४० वा कर्णधार, तर वनडेतील एकूण २५ वा कर्णधार असेल.
श्रीलंकेविरुद्ध १००० वनडे धावा
शिखरने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात १७ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो श्रीलंकेविरुद्ध वनडेत १००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरेल. तसेच, तो श्रीलंकेविरुद्ध सर्वात जलद १००० वनडे धावा करणाराही खेळाडू ठरेल. सध्या त्याच्या नावावर श्रीलंकेविरुद्ध १६ वनडे सामन्यांमध्ये ७०.२१ च्या सरासरीने ४ शतके आणि ५ अर्धशतकांसह ९८३ धावा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा करण्याची संधी
शिखरने ३५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो एकूण १४ वा भारतीय खेळाडू ठरेल. सध्या त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४१ सामन्यांत २४ शतकं आणि ४८ अर्धशतकांसह ९९६५ धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा फिलंच वेगळा’, सरावाला सुरुवात करताना हिटमॅनने केली भावनिक पोस्ट
‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादव करणार वनडे पदार्पण! स्वतः कर्णधाराने केली पुष्टी