मुंबई: मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीचा आज सहावा दिवस. आज किशोर गटाचे उपउपांत्य व उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात आले. तर कुमार गटाचे तिसऱ्या व उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले.
वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या पटांगणावर झालेल्या किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात अशोक मंडळने विजय क्लबचा ४८-३७ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली. संतोष ठाकूर व सूरज यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर मध्यंतरला २५-१८ अशी मिळवलेली आघाडी कायम ठेवत अशोक मंडळाने हा सामना ११ गुणांच्या फरकाने खिशात टाकला. किशोर गटात अशोक मंडळ प्रथमच अंतिम फेरीत खेळत आहे. अंतिम फेरीत त्यांची लढत श्रीराम मंडळाला पराभूत करणाऱ्या शिवमुद्रा क्लबशी होईल.
श्री राम मंडळ विरुद्ध शिवमुद्रा क्लब यांच्यात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बोनस गुणांचा तर पाऊस पडला, दोन्ही संघानी मिळवून तब्बल ३८ बोनस गुण मिळवले. शेवटपर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यंतराला ३६-३१ अशी शिवमुद्रा क्लबकडे आघाडी होती.
सामन्याच्या उत्तरार्धात शिवमुद्रा संघाने श्री राम मंडळावर दोन लोण देत सामन्यात आघाडी मिळवली. अभिषेक जाधव व समीर पवार यांचे चढाईतील तर ओमकार शिंदेच्या पकडीतील गुणांच्या जोरावर शेवटी शिवमुद्राने ८८-६५ असा विजय मिळवत अंतिमफेरीत प्रवेश मिळवला. श्री राम मंडळाचा तुषार शिंदे आपल्या संघास विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
या अगोदर झालेल्या किशोर गटाच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात अशोक मंडळाने बालविकास मंडळाचा ५४-१० असा सहज पाडाव केला. किशोर गटाच्या उर्वरित उपउपांत्यफेरीचे सामने देखील एकतर्फी झाले. शिवमुद्रा विरुद्ध विजय नवनाथ सामना शिवमुद्राने ६६-३२ असा विजय मिळवला. श्री राम क्रीडा मंडळाने ७०-४१ असा बंड्या मारुती संघाचा पराभव केला. विजय क्लब ने वारसलेन संघाला ६६-४२ असे गारद केले.
निवड चाचणीच्या सहाव्या दिवशी कुमार गटाच्या तिसऱ्या व उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात आले. न्यु परशुराम विरुद्ध विजय बजरंग व्यायाम शाळा याच्या झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना अंत्यत चुरशीचा झाला मध्यंतर पर्यत विजय बजरंग १३-१७ असा पिछाडीवर होता.
गणेश व स्वप्नीलच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजय बजरंग संघाने २७-२६ असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली. जय गुरुदत्ताने गुड मॉर्निंग संघाला ४८-१८ असे नमवले. गुड मॉर्निंग, विजय बजरंग, विकास क्रीडा मंडळ, दुर्गा माता, सिद्धी प्रभा, बंड्या मारुती, संघ उपउपांत्य फेरीत दाखल.
इतर संक्षिप्त निकाल: १)विकास मंडळ वि वि विहंग क्रीडा मंडळ(२७-२६), २)दुर्गामाता स्पो क्लब वि वि जय भारत (३३-३१), ३)सिद्धीप्रभा वि वि श्री गणेश स्पो क्लब (३३-०३), ४)बंड्या मारुती वि वि अमर भारत (४०-१४).