महाराष्ट्रीय मंडळाचे आद्य संस्थापक संस्थापक कै.कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी आपले जीवन शिक्षण व क्रीडा या विषयासाठीच व्यतीत केले आणि महाराष्ट्र मंडळ ही संस्था भक्कम पायावर उभी केली. त्यांचे हयातीत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, कार्यप्रवृत्त केले.
आपले जीवन अशा रीतीने शिक्षण व क्रीडा साठी समर्पित करणा-या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन, त्यांचा गौरव करून कै. कॅप्टन शिवरामपंत दामले क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र मंडळ ही संस्था प्रदान करीत असते. या पुरस्काराचे स्वरूप इस २५००१/- रोख, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व शाल असे आहे.
यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठय कबड्डी मार्गदर्शक व अर्जुन पुरस्कार विजेते मुंबईचे श्री राजू भावसार यांना महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त )यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. हा समारंभ रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रीय मंडळाच्या टिळक रोड येथे संपन्न झाला. सत्कारास उत्तर देताना श्री राजू भावसार यांनी त्यांना आपल्या जडणघडणीत शाळा व समाज यांचा खुप महत्वाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले.
तसेच सन १९८२ ते १९८६ या पाच वर्षांच्या कालावधीत पुण्यात आल्यामुळे मानसिक व शारीरिक जडणघडणीचा पाया पक्का झाला. कबड्डीला मोठे करणे हे त्यांचे ध्येय आहे, त्यानुसार तळागाळातील मुलांपर्यंत कबड्डी चा प्रचार व प्रसार करण्याचे अहोरात्र कार्य करत आहेत. शालेय जीवनापासूनच कबड्डी या खेळाची आवड निर्माण करण्यासाठी या खेळाला प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले. पुढील कार्यासाठी आजचा कै.कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार माझ्या दृष्टीने खूप मोलाचा आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले(निवृत्त) यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रीय मंडळ पारंपरिक खेळाला महत्त्व देत असल्याचा उल्लेख आवर्जून केला. ही संस्था शारीरिक, मानसिक व शैक्षणिक स्तरावर मनोबल वाढण्यासाठी जोर देत असते. कोरोना सारख्या परिस्थितीला सामोरे जात असताना रोगप्रतिकारक क्षमता महत्त्वाची ठरते आणि महाराष्ट्र मंडळ ही संस्था तंत्रशुद्ध व्यायाम प्रकारासाठी पूर्वीपासूनच महत्त्व देत आली आहे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यात त्यांना शुभेच्छा दिल्या. मंडळाचे संस्थापक कै. कॅप्टन शिवरामपंत दामले, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव कै. रमेश दामले आणि आता नातू श्री. धनंजय दामले यांच्या कडून हे पिढ्यानपिढ्या शिक्षण व शारीरिक शिक्षण या क्षेत्रातील कार्य निरंतरपणे सुरू आहे.
कै. कॅप्टन ले. जनरल यशवंत सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला क्रीडा पत्रकार पुरस्कार Inside Cricket या क्रीडा साप्ताहिकाचे व्यवस्थापकीय संपादक श्री.अमोल मचाले यांना महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस श्री धनंजय दामले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद कुलकर्णी यांनी केले याप्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.