मँचेस्टर। रविवारी(16 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला 89 धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे पाकिस्तान संघावर मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागत आहे.
तसेच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने त्याच्यावरही टीका होत आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही पाकिस्तान संघावर नाराजी व्यक्त करताना सर्फराजला डोके नसलेला(बेअक्कल) कर्णधार आहे, असे म्हणत त्याच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.
अख्तरने त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर त्याची नाराजी व्यक्त केली आहे.
अख्तर म्हणाला, ‘2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने जी चूक केली तीच चूक पाकिस्तान संघाने काल केली. मला समजत नाही सर्फराज इतका अक्कलशून्य कसा. तो विसरुच कसा शकतो की आपण धावांचा पाठलाग चांगला करत नाही. आपली ताकद ही गोलंदाजी आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.’
‘पाकिस्तानने अर्धा सामना तेव्हाच जिंकला होता, जेव्हा सर्फराजने नाणेफेक जिंकली होती. पण तो सामना हरण्यासाठी प्रयत्न करत होता. नाणेफेक खूप महत्त्वाची होती आणि जरी पाकिस्तानने 260 धावा केल्या असत्या तरी त्यांची गोलंदाजी पहाता त्यांनी या धावांचे रक्षण केले असते. त्यामुळे मला वाटते की हे खूप बुद्धिमत्ताहीन नेतृत्व होते.’
‘पाकिस्तान संघाच्या कर्णधाराकडून ही खूप वाईट आणि निराशाजनक कामगिरी होती. मला त्याच्यामध्ये(सर्फराजमध्ये) इम्रान खानची छटा पहायची होती. पण त्याच्यासाठी आता खूप उशीर झाला आहे.’
सर्फराजबरोबरच अख्तरने हसन अलीवरही टीका केली आहे. हसन अलीने भारताविरुद्ध खेळताना 9 षटकात 84 धावा देत 1 विकेट घेतली आहे.
अख्तर हसन अली बद्दल म्हणाला, ‘हसन अली, जो वाघा बॉर्डरवर उडी मारायला घाबरत नाही, पण जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा स्वत:ला झाकून देत नाही. त्याचे अनेक चेंडू शॉर्ट-पिचचे असतात. ‘मला टी20 क्रिकेट आणि पाकिस्तान सुपर लीग खेळत रहायचे आहे’ अशी हसनची मानसिकता वाटते. आपण पाहू शकतो की त्याने फलंदाजांना त्रास देणाऱ्या वेगाचे आणि स्विंगचे प्रदर्शन केलेले नाही.’
तसेच तो म्हणाला, ‘आपण साधारण पाकिस्तानी खेळाडूंकडून अविश्वसनीय गोष्टींची अपेक्षा करत आहोत.’
त्याचबरोबर अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकांवर टीका करताना म्हटले आहे की ‘आपले व्यवस्थापन मुर्ख आहे. सर्फराज 10 वी पास असलेल्या मुलासारखे वागत आहे, ज्याला काय करायचे, जिंकायचे कसे हे माहित नाही. त्याला जे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे ते तो करतो आणि त्यामुळे अखेर पराभूत होतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा होतो उंदीर, पाकिस्तानी महिलेने व्यक्त केला राग
–अखेर किंग कोहलीच आला पाकिस्तानच्या कर्णधाराच्या मदतीला
–पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात द्विशतकाबद्दल रोहितच्या मनात सुरु होता हा विचार