सध्या पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा टी२० सामना सोमवारी (२२ नोव्हेंबर) पार पडणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकने वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून माघार घेतली आहे.
पाकिस्तान संघाचा ३९ वर्षीय अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक बांगलादेश संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये. त्याचा आणि सानिया मिर्झाचा मुलगा इझान याची तब्येत बिघडली आहे. ही बातमी मिळताच शोएबने वेळ न दवडता ढाकावरून थेट दुबई गाठली. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघेही इझानसोबत दुबईमध्ये राहतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याबाबत वक्तव्य करत म्हटले आहे की, “मुलगा आजारी असल्यामुळे शोएब मलिक तिसरा टी२० सामना खेळू शकणार नाहीये, तो दुबईला परतणार आहे.”
पाकिस्तान संघाने ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या २ सामन्यात शोएब मलिक फलंदाजी करण्यासाठी आला होता. परंतु, त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.तो या दोन्ही सामन्यात १ धाव देखील करू शकला नाही. तो या मालिकेत फ्लॉप ठरत असला तरी देखील त्याने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी शोएब मलिकची निवड करण्यात आली नव्हती. परंतु, शेवटच्या क्षणी शोएब मकसुद दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्या ऐवजी शोएब मलिकला संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने पाकिस्तान संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या १८ चेंडुंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितची टॉस जिंकण्याची हॅट्रिक अन् नेटकऱ्यांनी विराटवर साधला निशाणा, भन्नाट मीम्स व्हायरल