टी२० विश्वचषकातील ४१ वा सामना पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या. कर्णधार बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी सामन्यात अर्धशतके झळकावली. शोएब मालिकने वेगवान अर्धशतक ठोकत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली.
उपांत्य फेरीत थाटात प्रवेश करणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या फळीत खेळणाऱ्या शोएब मालिकने आक्रमक फलंदाजी करताना वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक ठोकले. पाकिस्तान संघाकडून टी२० विश्वचषकात हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. या आधी उमर अकमलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१० च्या टी२० विश्वचषकात २१ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते.
टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावे आहे. त्याने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक केले होते. नेदरलँडच्या स्टीफन मायबर्गने आयर्लंडविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते. ग्लेन मॅक्सवेल, केएल राहुल आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी १८ चेंडूत अर्धशतक केले आहे.
योगायोग म्हणजे १९९९ साली शोएब मालिकने आजच्या दिवशी (७ नोव्हेंबर) शारजहाच्या याच स्टेडियमवर पदार्पण केले होते आणि २२ वर्षांनंतर त्याने याच स्टेडियमवर वेगवान अर्धशतक झळकावले.
शोएब मलिकने आपल्या डावात ६ षटकार मारले आणि एक चौकार लगावला. मलिकने ३०० च्या स्ट्राईक रेट धावा केल्या. मलिकने जबरदस्त फलंदाजी केली. मलिक जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठण्यासाठी मोठी फटके मारण्याची गरज होती आणि या खेळाडूने तशीच खेळी केली. मलिकने आपल्या डावातील शेवटच्या ७ चेंडूंमध्ये तुफानी फलंदाजी केली.






