राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२१ अत्यंत निराशाजनक जात आहे. संघाने खेळलेल्या पहिला चार पैकी तीन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी राजस्थानचे खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमी मजामस्ती करताना दिसून येत आहेत. राजस्थानचा सर्वात अनुभवी फिरकीपटू श्रेयस गोपाल हा आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोपालने केली भारतीय गोलंदाजांची नक्कल
राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फिरकीपटू असलेला श्रेयस गोपाल हा एक बुद्धिमान क्रिकेटपटू म्हणून परिचित आहे. गोपालची निरीक्षण क्षमता चांगली असून त्याद्वारे तो आजूबाजूच्या क्रिकेटपटूंची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. राजस्थानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये श्रेयस गोपाल तीन भारतीय दिग्गज गोलंदाजांचा गोलंदाजी शैलीची नक्कल करताना दिसून आला.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1384927437021016064?s=19
या व्हिडिओमध्ये श्रेयस गोपाल सर्वप्रथम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहप्रमाणे गोलंदाजी करतो. त्यानंतर दुसऱ्या वेळी तो रविचंद्रन अश्विनप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. अखेरीस त्याने भारताचा सर्वकालीन महान फिरकीपटू हरभजन सिंग याच्या गोलंदाजी शैलीची नक्कल केली. व्हिडिओच्या अखेरीस तो असे म्हणताना दिसत आहे की, “बुमराह मला म्हणाला होता की तू माझ्यापेक्षा उत्तमप्रकारे अशी गोलंदाजी टाकतो.”
श्रेयस गोपाल यापूर्वीदेखील अशा प्रकारे इतर गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आला होता.
श्रेयसची खराब कामगिरी
आयपीएल २०१८ पासून तो राजस्थान रॉयल्सचा प्रमुख क्रिकेटपटू आहे. मात्र मागील हंगामापासून तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. यावर्षीच्या पहिल्या चार सामन्यांपैकी त्याला केवळ दोन सामन्यात संधी देण्यात आली. यामध्ये तो एकही बळी मिळवू शकला नाही. श्रेयसने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ पासून आयपीएल खेळताना त्याने ४७ सामन्यांमध्ये ४८ बळी आपल्या नावे केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी, जिंकले सात सुवर्ण; नागपूरच्या अल्फियाचा समावेश
देवदत्त पडीक्कलसाठी लाल रंगाची जर्सी ठरतीये लकी? वाचा काय आहे नक्की कनेक्शन