---Advertisement---

आयपीएल २०१९मध्ये हॅट्रिक घेणारा श्रेयस गोपाळ ठरला दुसरा गोलंदाज, पहा व्हिडिओ

On: बुधवार, मे 1, 2019 7:16 PM
---Advertisement---

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पण या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज श्रेयस गोपाळने एक खास कारनामा केला.

त्याने या सामन्यात बेंगलोरचे दिग्गज फलंदाज विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस यांची विकेट घेत हॅट्रिक केली आहे. तो आयपीएलमध्ये यावर्षी हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने हा पराक्रम केला आहे.

पावसामुळे 5-5 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोर संघाकडून पहिल्याच षटकात विराट आणि डिविलियर्सने आक्रमक सुरुवात करताना वरुण ऍरॉनच्या गोलंदाजीवर तब्बल 23 धावा काढल्या.

तसेच त्यांनी दुसऱ्या षटकाचीही गोपाळच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूत एक षटकार आणि 1 चौकार आणि दुहेरी धावा काढत चांगली सुरुवात केली. परंतू चौथ्या चेंडू टाकताना गोपाळनेही चांगले पुुनरागमन करत 7 चेंडूत 23 धावा करणाऱ्या विराटला बाद केले. विराटने मोठा फटका मारण्याच्या नादात लियाम लिंव्हिगस्टोनकडे झेल दिला.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डिविलियर्सला 10 धावांवर असताना गोपाळने बाद केले. डिविलियर्सचा रियान परागने झेल घेतला. डिविलियर्स बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर पहिलाच चेंडू खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसलाही गोपाळने बाद करत हॅट्रिक साजरी केली. स्टॉयनिसचा झेल राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने घेतला.

गोपाळने घेतलेल्या या तीन विकेट्स नंतर बेंगलोरने पुढील चार विकेट्स तीन षटकात 26 धावांत गमावल्या. त्यामुळे 5 षटकात बेंगलोरला 7 बाद 62 धावा करता आल्या.

त्यानंतर बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननेही चांगली सुरुवात केली. राजस्थानकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या संजू सॅमसन आणि लियाम लिंव्हिगस्टोनने आक्रमक फलंदाजी करत 3.2 षटकात 41 धावा केल्या.

पण चौथ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सॅमसनला 13 चेंडूत 28 धावांवर असताना युजवेंद्र चहलने बाद केले. पण त्यानंतर लगेचच पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अखेर पंचांनी हा सामना 3.2 षटकानंतर रद्द केला आणि दोन्ही संघाना एक- एक गुण दिला.

मात्र त्यामुळे बेंगलोरचे आयपीएल 2019मधील आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आले आहे. तसेच राजस्थानचे आव्हानही जवळपास संपुष्टात आले असले तरी अजूनही अन्य सामन्यांच्या निकालावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह, प्रशिक्षक फ्लेंमिंगने दिली माहिती

ऑस्ट्रेलियाचा तो क्रिकेटपटू रोहित शर्माशी बोलला चक्क मराठीत, पहा व्हिडिओ

किंग्स इलेव्हन पंजाबसमोरील अडचणीत वाढ, निलंबणाची शक्यता

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment