धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याने मोलाचा वाटा उचलला. त्याला या मालिकेतील उत्तम कामगिरीबद्दल मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने या मालिकेतील तिन्ही सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. याबरोबरच त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली.
श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद ५७ धावा, दुसऱ्या टी२० सामन्यात नाबाद ७४ धावा आणि तिसऱ्या टी२० सामन्यात नाबाद ७३ धावा अशा मिळून २०४ धावा केल्या. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सलग ३ अर्धशतके करणारा भारताचा दुसराच खेळाडू ठरला. यापूर्वी केवळ विराटने असा विक्रम केला होता.
एवढेच नाही, तर श्रेयस असा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने ३ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच श्रेयस एका आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत बाद न होता सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने २०१९ मध्ये एका टी२० मालिकेत २१७ धावा केल्या होत्या (Shreyas Iyer became 1st Indian to score 200+ runs in a 3 match T20I Series).
एका आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत बाद न होता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२१७ – डेव्हिड वॉर्नर, २०१९
२०४ – श्रेयस अय्यर, २०२२
१९९ – हमझा तारिक, २०२१
१३८ – स्टिफन मायबर्ग, २०१५
१३१ – जेपी ड्यूमिनी, २०१०
एका आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत बाद न होता सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
२०४ – श्रेयस अय्यर, विरुद्ध श्रीलंका, २०२२
११० – केएल राहुल, विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६
८९ – मनिष पांडे, विरुद्ध न्यूझीलंड, २०२०
८८ – रोहित शर्मा, टी२० विश्वचषक, २००७
८५ – दिनेश कार्तिक, निदाहास ट्रॉफी, २०१८
भारताचे मालिकेत निर्भेळ यश
भारताने श्रीलेकविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिन्ही सामने जिंकल्याने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. या मालिकेतील लखनऊ येथे झालेला पहिला सामना भारताने ६२ धावांनी जिंकला होता. त्यानंतरचे दोन्ही सामने धरमशाला येथे झाले. दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७ विकेट्सने आणि तिसऱ्या टी२० सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला.
आता भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली येथे ४ ते ८ मार्चदरम्यान पार पडेल. त्यानंतर बंगळुरू येथे १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरा कसोटी सामना होईल. दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र प्रकारातील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराजच्या केसांवरून युझवेंद्र चहलने उडवली खिल्ली; म्हणाला, ‘असं वाटतंय, गवत सुखलंय आणि…’