कानपूर। भारताने ग्रीनपार्क येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने मोठा विक्रम केला आहे.
अय्यरने भारताच्या पहिल्या डावातही सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे याच सामन्यातून अय्यरने कसोटी पदार्पण केले आहे. तो कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात भारताकडून सर्वोच्च धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम लाला अमरनाथ आणि दिलवार हुसेन यांनी केला होता.
दिलवार हुसेर यांनी १९३४ साली इंग्लंडविरुद्ध कोलकाता विरुद्ध कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक ५९ धावा केल्या, होत्या, तर दुसऱ्या डावात ५७ धावांची खेळी केली होती. तसेच लाला अमरनाथ यांनी १९३३ साली इंग्लंडविरुद्धच मुंबई येथे कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या होत्या.
यानंतर आता पदार्पणाच्या कसोटीत भारताकडून दोन्ही डावात सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम श्रेयस अय्यरने तब्बल ८७ वर्षांनी केला आहे.
याशिवाय अय्यर भारताकडून पदार्पणाच्या कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम भारताकडून कोणालाही करता आला नव्हता.
या सामन्यात भारताने अय्यरच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांवर रोखत ४९ धावांचा आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरसह वृद्धिमान साहाने देखील नाबाद ६१ धावा करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
आता चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडने ४ षटकात १ बाद ४ धावा केल्या आहेत. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी ९ विकेट्स घ्याव्या लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हम में हैं दम! वृद्धिमान साहा कसोटीत अर्धशतक करणारा वयस्कर यष्टीरक्षक, ‘या’ दिग्गजाला टाकले मागे
कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा खो! आयसीसीने रद्द केली ‘ही’ प्रमुख स्पर्धा
श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच रचला मोठा इतिहास, ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय