भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत त्याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत,त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीला जोरदार सुरुवात केली आहे. त्याला पहिल्याच दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात येण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने रवींद्र जडेजासोबत मिळून शतकी भागीदारी केली. तसेच १५७ चेंडुंमध्ये १२ चौकार आणि २ खणखणीत षटकार खेचून त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
श्रेयस अय्यरच्या नावे झाली या विक्रमांची नोंद
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्नं असते. अनेकांचे हे स्वप्नं पूर्ण होते तर अनेकांचे हे स्वप्नं अपूर्ण राहून जाते. श्रेयस अय्यरने देखील हे स्वप्न पाहिले होते. आता हे त्याचे स्वप्नं सत्यात उतरले आहे. या शतकी खेळी सह तो पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा १६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच डावात शतक झळकावणारा १३ वा फलंदाज ठरला आहे. तसेच पदार्पणाच्या सामन्यात मायदेशात शतक पूर्ण करणारा तो १० वा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण करणारा गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर दुसराच फलंदाज ठरला आहे.
पदार्पणाच्या सामन्यात मुंबईकर खेळाडूंचा बोलबाला
श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण करणारा चौथा मुंबईकर फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि प्रवीण आमरे या मुंबईकर खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण केले होते. प्रविण आमरे यांनी १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १०३ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच रोहित शर्माने २०१३ मध्ये कोलकाताच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १७७ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने देखील वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २०१८ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला होता.