इंदोर | सईद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत आज(21 फेब्रुवारी) मुंबई संघाने सिक्कीम विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 258 धावांचा डोंगर उभा केला. यात श्रेयस अय्यरने 55 चेंडूत 147 धावा तर सुर्याकुमार यादवने 33 चेंडूत 63 धावा केल्या.
याबरोबरच अय्यरने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे. तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी हा विक्रम यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या नावावर होता. पंतने मागील वर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध 128 धावांची खेळी केली होती.
अय्यरने त्याच्या 147 धावांच्या खेळीत 7 चौकार 15 षटकार मारले आहे. त्यामुळे एका ट्वेंटी20 सामन्यात 15 षटकार मारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडूही ठरला आहे. याआधी हा विक्रमही पंतच्याच नावावर होता. त्याने 14 जानेवारी 2018 ला दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेश विरुद्ध 12 षटकार मारले होते.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सलामीवीर अजिंक्य रहाणे 11 तर कमबॅक करत असलेला पृथ्वी शाॅ 10 धावांवर बाद झाले.
यानंतर सामन्याची सुत्र आपल्या हातात घेत श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला सुर्याकुमार यादवने 2 षटकार आणि 8 चौकारांची बरसात केली.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्या टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर, वाचा काय आहे कारण
–चेतेश्वर पुजाराचे व्हर्जन २.०, टी२० सामन्यात केली नाद खेळी!






