---Advertisement---

‘पदार्पणाचे हे दोन दिवस आयुष्यभर माझ्यासोबत राहतील’, श्रेयस अय्यरने शेअर केली भावुक पोस्ट

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 12:52 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्या गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतासाठी युवा फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पण केले. अय्यरने त्याला मिळालेल्या पदार्पणाच्या संधीचा योग्य फायदा करून घेतला. त्याने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. अय्यर आता भारतीय संघातील १६ वा खेळाडू ठरला आहे, ज्याने त्याच्या कसोटी पदार्पण सामन्यात शतक केले. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी अय्यरला भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कसोटी पदार्पण कॅप दिली होती.

अय्यर भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा ३०३ वा खेळाडू ठरला आहे. त्याने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात १७१ चेंडूचा सामना केला आणि १०५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. भारतासाठी पहिल्या डावात अय्यरव्यतिरिक्त शुभमन गिल (५२) आणि रवींद्र जडेजा (५०) यांनी अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी सुनील गावसकरांकडून पदार्पण कॅप मिळाल्यामुळे अय्यर आनंदी असल्याचे दिसले.

अय्यरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये गावसकर त्याला कसोटी पदार्पण कॅप देत आहेत. त्याने सोशल मीडियावरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुनील गावसकर सरांकडून आपली कसोटी कॅप मिळवण्यापासून ते कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, मी या दोन्ही दिवसांना आयुष्यभर माझ्यासोबत ठेवेल. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि अद्भूत समर्थनासाठी धन्यवाद.”

अय्यरने शतकी खेळी केल्यानंतर  प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सुनील गावसकर सरांनी मला कॅप देताना महत्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले होते, तुला भविष्याविषयी विचार करण्यीच गरज नाहीय आणि भविष्याविषयी विचार नाही कारायचा. तुला केवळ वर्तमानाविषयी विचार करायचा आहे आणि पुढच्या चेंडूवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी तेच केले.”

तो म्हणाला की, सुनील गावसकर सरांकडून कॅप मिळवणे एखाद्या परिकथेसारखे होते. मी असा विचार करत होतो की राहुल सर मला कॅप देतील. दोघेही या खेळाचे दिग्गज आहेत आणि दोघांपैकी कोणीही कॅप दिली असती, तरी मला आनंद झाला असता.

अय्यर ज्याप्रकारे बाद झाला त्यामुळे तो निराश आहे. तो याबाबत म्हणाला की, हा खूप चांगला अनुभव होता आणि ज्याप्रकारे गोष्टी पुढे चालल्या होत्या, त्यामुळे मी आनंदी होतो, पण मी ज्याप्रकारे बाद झालो त्यासाठी मी संतुष्ट नाहीय.

दरम्यान, भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ३४५ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही वेकेट न गमावता १२९ धावांचा टप्पा गाठला आहे. भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या शेवटी २१६ धावांनी आघाडीवर होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आढळल्याने रद्द होणार भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा? बीसीसीआयकडून मिळाली माहिती

‘आता आमरे सरांना डिनरसाठी बोलवू शकतो’, पदार्पणातील शतक करत श्रेयस अय्यरने पाळला शब्द

पहिल्या कसोटीदरम्यान भारतीय पंचांचे निराशाजनक निर्णय, न्यूझीलंडचा सलामीवीर तीन वेळा बचावला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---