इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. या विजयानंतर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने पुन्हा एकदा स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम केली आहे. परंतु अनेकदा असेही म्हटले गेले आहे की, पुन्हा श्रेयस अय्यरला संघाचे कर्णधारपद दिले गेले पाहिजे. आता स्वत: श्रेयस अय्यरने संघाच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व युवा रिषभ पंतच्या हाती देण्यात आले होते. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. ही स्पर्धा आता पुन्हा एकदा युएईमध्ये सुरू झाली आहे. या टप्प्यात श्रेयस अय्यरने देखील फिट होऊन जोरदार पुनरागमन केले आहे. पण तो कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून मैदानात उतरला आहे.
श्रेयस अय्यरने हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर म्हटले की, “जेव्हा मला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, त्यावेळी माझी मानसिकता वेगळीच होती. तसेच माझी निर्णय घेण्याची क्षमता आणि सहनशीलतेचा स्तर खूप उंच होता. ज्याचा मला गेल्या २ वर्षात खूप फायदा झाला.”
रिषभ पंतच्या नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की, “हा फ्रँचायजीने घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयाचा मी आदर करतो. रिषभ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच कर्णधाराची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. फ्रँचायजीने हा निर्णय घेतला की, त्याला हंगामाच्या शेवटपर्यंत संघाचे कर्णधारपद दिले गेले पाहिजे. मी या निर्णयाचा आदर करतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आणखी कुठलाच मोठा बदल जाणवला नाही. सध्या संपूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रित करतोय. जेव्हा मी कर्णधार होतो तेव्हा मला दबावात खेळायला आवडायचे. कारण दबाव असला की, तुमच्यासमोर अधिक आव्हाने असतात आणि अशा परिस्थितीत मी चांगली कामगिरी करतो.” श्रेयस अय्यरने सनरायझर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४१ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने नाबाद ४७ धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!
“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”
रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी; पण तो म्हणाला, ‘देवासोबत कोण बोलतं’, पाहा भावनिक प्रसंग






