आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (आयसीसी, ICC) फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत ‘प्लेयर ऑफ द मंथ‘ पुरस्कार (Player Of The Month) जिंकणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. भारताचा मधळ्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने यूएईच्या वृत्या अरविंद आणि नेपाळच्या अष्टपैलू दिपेंद्र सिंग ऐरी यांना पछाडत त्याने हा पुरस्कार जिंकला आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये न्यूझीलंडच्या अष्टपैलू एमिलिया केर (Amelia Kerr) हिने हा पुरस्कार जिंकला आहे.
श्रेयस अय्यरचे फेब्रुवारी महिन्यातील प्रदर्शन
बंगळुरू कसोटीत श्रीलंकेविरुद्ध दोन्ही डावात अर्धशतक ठोकणाऱ्या श्रेयसने मागील फेब्रुवारी महिन्यात काही अप्रतिम खेळी खेळल्या होत्या. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १७४.३५ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक २०४ धावा केल्या होत्या. त्याने या मालिकेतील तिन्ही सामन्यात नाबाद राहात अर्धशतक ठोकले होते. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
श्रेयसला सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे फलंदाजी क्रमात बढती मिळाली होती. याचा फायदा घेत त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले होते.
Unveiling the ICC Players of the Month for February 2022 👀
⬇️ ⬇️ ⬇️
— ICC (@ICC) March 14, 2022
एमिलिया केरचे फेब्रुवारी महिन्यातील प्रदर्शन
महिला क्रिकेटपटूंमधील फेब्रुवारी महिन्यातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू ठरलेल्या एमिलिया केरनेही या महिन्यात काही प्रशंसनीय खेळी केल्या होत्या. या २१ वर्षीय अष्टपैलूने विश्वचषकापूर्वी भारताविरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेदरम्यान शानदार प्रदर्शन केले होते. तिने भारताविरुद्ध वनडे मालिकेत १ शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक ३५३ धावा केल्या होत्या. तसेच आपल्या लेग स्पिनने भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवत ७ विकेट्सही घेतल्या होत्या. तिच्या या प्रदर्शनासाठी तिला मालिकावीरही निवडले गेले होते.
विशेष म्हणजे, एमिलियाने भारताच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू दिप्ती शर्मा यांना हरवत फेब्रुवारी महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावला आहे.
अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंत’ बनले मालिकावीर! ‘या’ कारणांमुळे श्रेयस आणि बुमराह ऐवजी रिषभ पंत ठरला मालिकावीर
आयपीएल २०२२ मध्ये सामन्यात मिळणार चार डीआरएस, नवीन नियम जाहीर; वाचा सविस्तर
ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम