भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात नुकतीच टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताकडून युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शानदार कामगिरी केली. त्याने मालिकेतील तिन्ही सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान आता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला आशा असेल की, श्रेयसचा हा फॉर्म आगामी आयपीएल स्पर्धेतही कायम रहावा. केकेआरचे नेतृत्त्व आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये श्रेयस करणार आहे. श्रेयसने याबद्दल नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर गेल्यावर्षी श्रेयस बराच काळ दुखापतीमुळे क्रिकेटला मुकला. यादरम्यान त्याला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचेही नेतृत्त्व सोडावे लागले. श्रेयस २०१५ पासून दिल्ली संघाकडून आयपीएल खेळत होता. त्याने २०१९ आणि २०२० हंगामात दिल्लीचे नेतृत्त्व करतासा संघाला प्लेऑफ पर्यंत पोहचवले होते. महत्त्वाचे म्हणजे २०२० मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीने अंतिम सामन्यात देखील प्रवेश केला होता.
पण, २०२१ आयपीएलपूर्वी तो इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाकडून खेळत असताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यामुळे श्रेयसला आयपीएल २०२१ हंगामातील पहिला टप्पा खेळता आला नाही. त्याच्याऐवजी संघाने रिषभ पंतकडे नेतृत्त्व सोपवले. नंतर जेव्हा श्रेयस दुसऱ्या टप्प्यात खेळण्यासाठी संघात परतला तेव्हा त्याला कर्णधारपद परत न देता फ्रँचायझीने पंतकडेच कर्णधारपद कायम ठेवले होते.
यानंतर आयपीएल २०२२ आधी श्रेयस दिल्ली संघातून मुक्त झाला आणि लिलावात सहभागी झाला होता. आयपीएल लिलावात त्याला केकेआरने १२.२५ कोटी रुपयांसह खरेदी केले आणि नेतृत्त्वाची जबाबदारीही दिली. याबद्दल आता श्रेयने मोठे भाष्य केले आहे.
श्रेयसला जेव्हा विचारण्यास आले की, दुखापत की कर्णधारपद गमावणे, यातील मोठा धक्का कोणता होता, तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रेयसने सांगितले की जर त्याला दुखापत झाली नसती तर त्याला कर्णधारपद गमवावे लागले नसते (Shreyas opens up on losing Delhi Capitals captaincy).
श्रेयस म्हणाला, ‘दुखापत मोठा धक्का होता. जर दुखापत झाली नसती, तर त्यांनी मला कर्णधारपदावरून हटवले नसते. तुम्ही २०२१ हंगामातील सुरूवातीला दिल्ली कॅपिटल्स संघात ते वातावरण पाहिले, जे आम्ही २०१९ आणि २०२० मध्ये बनवले होते. वातावरण मस्त होते. खेळाडू एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांना एकमेकांची ताकद आणि कमजोरी माहित होती. मला याबद्दल फार खोलात जायचे नाही.’
श्रेयस पुढे म्हणाला, ‘कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. याबद्दल नंतर कळाले. मी न्यूझीलंडमध्ये माझी भूमीका निभावत होतो. मला खरंतर माझ्यावर आणि माझ्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास जाणवत होता. कर्णधार म्हणून माझ्यासाठी आयपीएलचा हंगाम शानदार राहिला होता. मी जवळपास ५०० धावा केल्या होत्या. मी चांगल्या मानसिकतेत होतो आणि त्याचवेळी दुखापतीने त्रास देण्यास सुरुवात केली. जबरदस्तीने घेतलेला ब्रेक कधीच सोपा नसतो. कारण तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागते.’
तो पुढे म्हणाला, ‘दुखापती त्रासदायक असतात. पण मला असे सांगावेच लागेल, की माझ्यासाठी ते वाईटातून चांगले घडले. मी पूर्ण बरा झालो आणि पुनरागमन केले. त्यामुळे जे होते, ते चांगल्यासाठी असते.’
श्रेयस अय्यर आता आयपीएल २०२२ मध्ये केकेआर संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तेजतर्रार राशिद! स्टार्क-ब्रेट लीला मागे सोडत ‘त्या’ विक्रमावर सांगितला हक्क
Video: पोलार्ड झाला फिरकीपटू! त्रिनिदाद टी१० स्पर्धेत यष्टीरक्षक फलंजादाला अडकवले फिरकीच्या जाळ्यात