भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉला सलामी फलंदाजाची भूमिका देण्यात आली होती. त्या सामन्यात पृथ्वी शॉ पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यांनतर शुबमन गिलला संघात संधी देण्यात आली होती. तेव्हापासून गिल भारतीय संघाच्या सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे.
रोहित शर्मा आणि गिलच्या जोडीने भारतीय संघाला काही सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. परंतु या मालिकेत गिलला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात सलामी फलंदाज म्हणून कोणाची निवड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने रोहित शर्मा सोबत सलामीला येऊन भारतीय संघाला काही सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. परंतु इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या मालिकेत त्याला एकच अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. त्यामुळे ४ मार्च पासून सुरु होत असलेल्या कसोटी सामन्यात त्याला शेवटची संधी देण्यात येऊ शकते.
रोहित शर्माची उत्कृष्ट कामगिरी
तर दुसरीकडे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे.या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माने ६६ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ४९ धावांचा पाठलाग करत असताना षटकार मारत भारतीय संघाला सामना जिंकवून दिला होता.
यासोबतच त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात १६१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामना ३१७ धावांनी जिंकला होता. शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केलेली कामगिरी पाहता चौथ्या सामन्यात हे दोघेच सलामीसाठी येतील असे दिसून येत आहे.
केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांच्या प्रतीक्षेत होणार वाढ
केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोघे ही भारतीय संघात सलामीसाठी प्रबळ दावेदार आहेत. मयंक अगरवालने भारतीय संघासाठी एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत यात त्याने ५४.५ च्या सरासरीने १०५२ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच केएल राहुलने खेळलेल्या ३६ कसोटी सामन्यात २००६ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ शतक आणि ११ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगली कामगिरी करत असताना मयंक आणि राहुलला संघात स्थान मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
केरळ संघाला मोठा धक्का!! नॉकआऊट सामन्यांपूर्वी हा स्टार खेळाडू झाला संघाबाहेर
दमदार कामगिरीचे पृथ्वी शॉला मिळाले बक्षीस, या मोठ्या स्पर्धेत सांभाळणार मुंबईचे नेतृत्व






