रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. या दौऱ्यासाठी भारत अ संघातील अनेक युवा खेळाडूंना वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे.
मात्र युवा फलंदाज शुबमन गिलला भारताच्या एकाही वरिष्ठ संघात संधी मिळालेली नाही, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले आहे. मागील अनेक दिवसांपासून गिल भारत अ संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
त्याने नुकत्याच पार पडलेल्या विंडीज अ संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतही 3 अर्धशतकांसह 54.5 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहेत. पण तो भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे भारताच्या निवड समीती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.
पण असे असले तरी पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी भारताच्या एकाही संघात संधी न मिळाल्याने निराश झाला असल्याचे गिलने स्पष्ट केले आहे.
क्रिकेटनेक्स्टला सांगताना गिल म्हणाला, ‘मी रविवारी भारताचा वरिष्ठ संघ जाहिर होण्याची वाट पाहत होतो. मला अपेक्षित होते की एका तरी संघात माझी निवड होईल. निवड न झाल्याने माझी निराशा झाली. पण मी यावर विचार करण्यात वेळ घालवणार नाही. मी धावा करत राहिल आणि निवड समीतीवर छाप पाडण्यासाठी माझी सर्वोत्तम कामगिरी करत राहिल.’
तसेच विंडीज अ विरुद्ध भारत अ संघात झालेल्या वनडे मालिकेबद्दल गिल म्हणाला, ‘ही माझ्यासाठी आणि संघासाठी शानदार मालिका होती. आम्ही ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. वैयक्तिकरित्या मला वाटते मी पुढे असाच खेळ चालू ठेवला पाहिजे आणि मी केलेल्या अर्धशतकांपैकी निदान दोनवेळा तरी शतक करायला हवे होते. पण मी या अनुभवातून शिकेल.’
भारत अ संघाच्या या वेस्ट इंडीज दौऱ्याबद्दल पुढे गिल म्हणाला, ‘मी माझ्या पहिल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातून मोठा धडा शिकलो की सामन्याच्या परिस्थितीनुसार मी माझ्या नैसर्गिक खेळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’
‘चांगल्या चेंडूना रोखणे महत्त्वाचे आहे, तसेच खेळपट्टीवर शक्य तितक्या जास्त वेळ थांबले पाहिजे. खेळपट्टीवर जो खेळाडू स्थिर झाला आहे त्याने कठिण काळात चांगली फलंदाजी केली पाहिजे.’
गिल आता वेस्ट इंडीज अ विरुद्ध 24 जूलैपासून भारत अ संघाकडून तीन कसोटी सामने खेळणार आहे. याबद्दल तो म्हणाला, ‘पहिली कसोटी अँटिग्वामध्ये होणार आहे. जिथे मी काही वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे मला खेळपट्टी माहित आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली नाही. तूम्हाला तूमचे शॉट्स खेळण्यासाठी पहिले काही तास स्वत:ला द्यावे लागतात.’
‘त्यानंतर पुढचे दोन्ही कसोटी सामने त्रिनिदादला होणार आहेत. तिथे मी आधी खेळलेलो नाही. त्यामुळे ते एक आव्हान असेल.
तसेच तो कसोटीमध्ये त्याच्या फलंदाजी क्रमवारीबद्दल म्हणाला, ‘मला खात्री नाही की मी कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करेल. मी उद्या सरावासाठी संघात सामील होईल आणि संघ व्यवस्थापनाकडून पुढील योजना जाणून घेईल. मला जी जबाबदारी दिली, त्यात मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेने कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बेन स्टोक्सचा नकार; या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी केली विलियम्सनची शिफारस
–वनडे, टी२० नंतर आता कसोटीमध्येही क्रमांक आणि नाव असलेली जर्सी घालणार इंग्लंडचे खेळाडू
–भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी२०सामन्यांसाठी असा आहे विंडीजचा संघ; या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन