भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटीत झालेल्या थरारक पराभवानंतर भारतीय संघाच्या उपकर्णधार रिषभ पंतच्या दुखापतीबाबत कर्णधार शुबमन गिलनं मोठी माहिती दिली आहे. पंतला सामन्याच्या पहिल्याच दिवशी बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला विकेटकीपिंगपासून दूर राहावं लागलं, मात्र त्यानं जिगरबाज फलंदाजी करत 74 धावांची खेळी केली.
गिलनं सामन्यानंतर सांगितलं, “रिषभ स्कॅनसाठी गेला आहे. सुदैवानं गंभीर दुखापत नाही. तो मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी फिट होईल, अशी अपेक्षा आहे.”
ही दुखापत पंतला जसप्रीत बुमराहच्या 34व्या षटकात लेगसाईडला गेलेल्या चेंडूवर डाईव्ह मारताना झाली. काही वेळ कीपिंग केल्यानंतर तो वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला आणि उर्वरित सामन्यात कीपिंग करू शकला नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेलनं विकेट्समागील जबाबदारी सांभाळली.
तरीसुद्धा, पंतने जिद्दीने फलंदाजी करत पहिल्या डावात केएल राहुलसोबत भागीदारी रचत 74 धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या दुखापतग्रस्त बोटावर लक्ष्य करत बाऊन्सर टाकले, पण पंतनं हार मानली नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुसऱ्या डावात प्रत्येकी तीन विकेट घेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला. या विजयासह, इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारताने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला.






