---Advertisement---

शुभमन गिलच्या जबरा फलंदाजीचा लाल रुमालाशी आहे संबंध, घ्या जाणून 

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 8:54 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या मैदानावर चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (१९ जानेवारी) अखेरचा दिवस आहे. यादिवशी भारताने ४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली असून लँच ब्रेकपर्यंत १ बाद ८३ धावा केल्या आहेत. यात भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्या अर्धशतकी खेळीचा वाटा आहे. यादरम्यान गिल त्याच्या खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवून फलंदाजी करताना दिसला. त्यामुळे चाहत्यांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे.

खरे तर, खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवून फलंदाजीसाठी मैदानावर उतरण्याची ही गिलची पहिली वेळ नाही. याचे ताजे उदाहरण काही दिवसांपुर्वी झालेल्या सिडनी कसोटी सामन्यात पाहायला मिळाले होते. या सामन्यात त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले होते आणि त्यावेळी त्याच्या खिशात लाल रंगाचा रुमाल होता. तसेच आयपीएल २०२० दरम्यान बऱ्याचदा खिशात लाल रुमाल ठेवून जबरा फलंदाजी करताना गिल कॅमेरात कैद झाला होता.

यामागचे कारण म्हणजे, गिल लाल रुमाल स्वत:साठी लकी असल्याचे मानतो. एका मुलाखतीत स्वत: गिलने याचा खुलासा केला होता.

१९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना त्याने झुंजार शतक केले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिलने सांगितले होते की, “मी नेहमी फलंदाजी करताना लाल रुमाल माझ्यासोबत ठेवत असतो. यापुर्वी मी पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवत असायचो. पण एका दिवशी मी लाल रुमाल सोबत घेऊन फलंदाजी केली आणि त्या सामन्यात मी शतक केले. तेव्हापासून लाल रुमाल माझा एक अविभाज्य भाग बनला आहे.”

झहीर खानही सोबत ठेवत असे रुमाल 

गिलव्यतिरिक्त मोहिंदर अमरनाथ, विरेंद्र सेहवाग आणि स्टिव्ह वॉ अशा महान खेळाडूंनाही फलंदाजीदरम्यान असा तोटका आजमावताना सर्वांनी पाहिले आहे. एवढेच नाही तर, भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान हा गिलप्रमाणे रुमाल खिशात ठेवून मैदानावर उतरत असायचा. परंतु तो लाल नव्हे तर पिवळ्या रंगाचा रुमाल वापरत असे.

शुबमन गिलचे अर्धशतक पूर्ण 

शुबमन गिलच्या ब्रिस्बेन कसोटीतील फलंदाजीविषयी बोलायचे झाले तर, सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर तो शून्य धावांवर होता. परंतु पाचव्या दिवसाची सुरुवात त्याने जबरदस्त फटकेबाजीने केली. लँच ब्रेकपर्यंत ११७ चेंडूत त्याने ६४ धावा केल्या आहेत. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारले आहेत. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा त्याची साथ देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शुभमनच्या अर्धशतकामुळे पहिल्या सत्रात भारताचे वर्चस्व; अद्याप भारताला २४५ धावांची गरज

Video : रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का; टीम पेनने घेतला अप्रतिम झेल

भारतीय संघ या मालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक चांगला खेळला, ‘या’ माजी दिग्गजाने केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---