भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. आज (17 ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशी सकाळी नाणेफेक झाली. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा यानं जेव्हा प्लेइंग 11 जाहीर केली, तेव्हा त्यामध्ये एका नियमित खेळाडूचं नाव नव्हतं. हा खेळाडू आहे युवा फलंदाज शुबमन गिल. गिल या सामन्याचा भाग नाही. तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं गिलला वगळण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
वास्तविक, शुबमन गिलच्या मानेमध्ये समस्या आहे. या कारणामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत मुंबईचा फलंदाज सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. नाणेफेक झाल्यानंतर बीसीसीआयनं ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली. शुबमन गिलच्या मानेमध्ये समस्या असल्याचं बोर्डानं सांगितलं. याच कारणामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळत नाहीये.
शुबमन गिलनं गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. परंतु पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो बंगळुरू कसोटीतून बाहेर पडला आहे. गिल तंदुरुस्त झाल्यास दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा निश्चितपणे समावेश होईल.
गिलच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या सरफराज खानचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं टीम इंडियासाठी 3 कसोटी सामनेही खेळले आहेत. त्यानं यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. सरफराजनं भारतासाठी 3 कसोटी सामन्यांमध्ये 200 धावा केल्या आहेत. अलीकडेच त्यानं दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषकात शानदार कामगिरी केली होती. सरफराजचा फॉर्म पाहता त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. आता गिल बाहेर पडल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
हेही वाचा –
रिकी पाँटिंगनंतर हा भारतीय क्रिकेटपटू होणार दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक
केदार जाधवचा संघ LLC चॅम्पियन! इरफान पठाणच्या संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव
आता कसेही पैसे खर्च करा! आयपीएल रिटेन्शन नियमांमध्ये मोठे बदल