भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले, त्यानंतर आता त्याने एजबॅस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. गिलचे इंग्लंडविरुद्धचे हे सलग तिसरे कसोटी शतक आहे. या शतकासह, त्याने इंग्लंडविरुद्ध सलग तीन शतके झळकावण्याच्या बाबतीत राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे.
शुबमन गिल इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गिलच्या आधी अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे. गिलने बर्मिंगहॅम आणि लीड्समध्ये शतके झळकावली. त्याआधी, मार्च 2024 मध्ये धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध 110 धावा केल्या होत्या. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. भारताचा कसोटी कर्णधार झाल्यापासून गिल वेगळ्याच रूपात दिसत आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सलग तीन शतके झळकावणारे भारतीय
मोहम्मद अझरुद्दीन (1984-85)
दिलीप वेंगसरकर (1985-86)
राहुल द्रविड (2002, 2008-11)
शुबमन गिल (2024-25)
एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने 5 गडी गमावून 310 धावा केल्या आहेत. गिल 114 आणि रवींद्र जडेजा 41 धावा करून नाबाद परतला. आतापर्यंत त्यांच्यात 99 धावांची भागीदारी झाली आहे. त्याआधी भारताकडून यशस्वी जयस्वाल 87 धावा करून बाद झाला. जर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर दुसऱ्या दिवशीही या दोन्ही (गिल-जडेजा) फलंदाजांना आपला डाव वाढवावा लागेल.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने दोन, तर ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






