विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून, तर न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर पुढील ३ सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलॅंड संघाला पराभूत केले. तरीदेखील भारतीय संघाला उपांत्य फेरीत मजल मारता आली नाही.
दरम्यान, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू साईमन डूल यांनी भारतीय संघाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील वेळापत्रकाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्याने केली होती. या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. हा सामना रविवारी पार पडला होत. त्यांनतर ३१ ऑक्टोबर म्हणजे पुढच्या रविवारी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात देखील भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत व्हावे लागले होते.
क्रिकबजवर चर्चा करताना साईमन डूल यांनी म्हटले की, “भारतीय संघाच्या या वेळापत्रकात अहंकाराची झलक दिसते. ब्रॉडकास्टरची इच्छा होती की, भारतीय संघाचे सामने दिवाळी आणि सुट्ट्यांमध्ये व्हावे जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या मिळावी. पाकिस्तान संघाविरुद्ध पहिला सामना होणार हे निश्चित होते. परंतु दुसरा सामना त्यांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध नव्हता खेळायला पाहिजे. हा सामना सर्वात शेवटी झाला पाहिजे होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झाला पाहिजे होता.”
ग्रूप२ मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय संघ पहिल्या २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर, भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाणारा मार्ग कठीण झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत सलग ३ सामन्यात विजय मिळवला. परंतु, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी देखील या ग्रुपमधून चांगले प्रदर्शन करत भारतापेक्षा अधिक गुण जिंकत उपांत्य फेरी गाठली.
महत्त्वाच्या बातम्या –
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार, एक नजर त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त वक्तव्यांवर
आयपीएल २०२२ साठी आरसीबीने केली मुख्य प्रशिक्षकाची घोषणा; विजेतेपद जिंकण्याचा केला निर्धार