fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

यूएस ओपनमधून या दोन स्टार खेळाडूंना पराभवाचा धक्का

सोमवार, 27 आॅगस्टपासून सुरु झालेल्या यूएस ओपनमध्ये पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहेत. अव्वल मानांकीत सिमोना हालेप आणि जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असणाऱ्या ग्रिगॉर दिमिट्रोवला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

हालेपला महिला एकेरीत एस्टोनियाच्या कैया कानेपीने 6-2,6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

1 तास 16 मिनिटे चाललेल्या या सामन्यात कानेपीने आक्रमक सुरुवात करताना सहा पैकी पहिले पाच गेम्स सलग जिंकले. तसेच तिला या सेटमध्ये एकदाही ब्रेकपॉइंटला सामोरे जावे लागले नाही. हा सेट तिने 6-2 असा सहज जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही तिने तिचा आक्रमक खेळ कायम ठेवला. तिने दुसऱ्या सेटमधीलही पहिले तीनही गेम्स जिंकत आघाडी कायम ठेवली होती. पण त्याचवेळी हालेपने तिला लढत देण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये हालेपने सामन्यात पुनरागमन केले. अखेर तिला हा सेट 4-4 असा बरोबरीचा करण्यात यश आले होते. परंतू त्यानंतर पुन्हा एकदा कानेपीने हालेपवर वर्चस्व ठेवत दुसऱ्या सेटमधील 9 आणि 10 वा गेम जिंकत सामनाही जिंकला.

हालेप यूएस ओपनमध्ये सलग दुसऱ्या वर्षी पहिल्याफेरीत पराभूत झाली आहे. मागील वर्षी तिला मारिया शारापोव्हाने पराभूत केले होते.

तसेच पुरुष एकेरीत दिमिट्रोवला तिनवेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या स्टॅन वावरिंकाने 6-3, 6-2, 7-5 अशा फरकाने पराभूत केले आहे. 2018 मध्ये दुसऱ्यांदा हे दोघे पहिल्याच फेरीत आमने सामने आले होते.

जागतिक क्रमवारीत 101 व्या स्थानी असणाऱ्या वावरिंकाने दुखापतीनतंर दमदार पुनरागमन केले आहे. त्याला डाव्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे काहीवेळ टेनिसपासून दूर रहावे लागले होते.

वावरिंकाने 2 तास 24 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 7 गेम्सनंतर 3-4 अशी आघाडी घेतली होती. यानंतर त्याने दोन सलग गेम्स जिंकत या सेटमध्ये विजय मिळवला. वावरिंकाने दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम ठेवली.

त्याने दुसऱ्या सेटमधील पहिले चारही गेम्स जिंकून  दिमिट्रोववर वर्चस्व ठेवले आणि त्याने हा सेट 6-2 अशा फरकाने सहज जिंकत आघाडी मिळवली. तिसरा सेट मात्र संघर्षपूर्ण झाला. परंतू तरीही वावरिंकाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला नाही. त्याने हा सेटही जिंकून सामन्यात विजय मिळवत यूएस ओपनची शानदार सुरुवात केली.

या सामन्यात दिमिट्रोव आणि वावरिंका आठव्यांदा आमने सामने आले होते. यात दोघांनीही आत्तापर्यंत एकमेकांवर प्रत्येकी 4 विजय मिळवले आहेत.

वावरिंकाचा पुढील सामना 139 क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या यूगो हम्बर्ट विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक

एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान

एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

You might also like