---Advertisement---

अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 6:33 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गाजवला. त्याने या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात खेळताना ताबडतोड शतकी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनला मारलेल्या रिव्हर्स स्वीपची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

झाले असे की रिषभ पंत ८९ धावांवर खेळत असताना अँडरसन डावातील ८३ वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी अँडरसनने वेगाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर पंतने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला आणि चेंडू सीमापार गेला.

कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज वेगवान गोलंदाज समजल्या जाणाऱ्या आणि ६०० पेक्षाही अधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या अँडरसनच्या विरुद्ध त्याने रिव्हर्स स्वीपचा फटका पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यामुळे या फटक्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच या फटक्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफनेही ‘वाह!’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे २०१४ सालानंतर अँडरसनविरुद्ध कसोटीत रिव्हर्स स्वीप किंवा पुलचा फटका मारणारा पंत हा पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी २०१४ सालानंतर असा कारनामा कोणत्याच फलंदाजाला जमला नव्हता.

https://twitter.com/89_Gabba/status/1367787595694972928

पंतची प्रतिक्रिया 

या फटक्याबद्दल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंतला विचारले असता पंत म्हणाला, ‘रिव्हर्स स्वीप मारताना, तुम्हाला आधी विचार करावा लागतो, पण जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने होत असतात, तेव्हा ते होते. मला खेळाचे आकलन झाल्यानंतर बऱ्याचदा माझे शॉट खेळण्याचे लायसन्स मला मिळते. प्रेक्षकांचे मनोरंजन होत असेल, तर मी आनंदी आहे.’

अँडरसननेच केले बाद –

अँडरसनना ८३ व्या षटकात रिव्हर्स स्वीप मारल्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंतने जो रुटला षटकार खेचत शतक पूर्ण केले. हे मात्र, अखेर त्याचा हा झंझावात ८५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अँडरसननेच संपवला. अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर पंत रुटकडे झेल देऊन बाद झाला. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या. त्याला वॉशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली. सुंदर आणि पंतमध्ये ११३ धावांची भागीदारी झाली.

रिषभ आहे जबरदस्त फॉर्ममध्ये –

रिषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या ६ सामन्यात ६४.३७ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या आहेत. यात तो दोनवेळा नव्वदीत बाद झाला आहे. तर यात एका शतकाचाही समावेश आहे.

दुसऱ्या दिवसाखेर भारत आघाडीवर 

दुसऱ्या दिवसाखेर भारताने रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर ९४ षटकात ७ बाद २९४ धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुदंर ११७ चेंडूत ६० धावांवर आणि अक्षर पटेल ३४ चेंडूत ११ धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने ८९ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

द्रविडच्या ‘त्या’ क्लबमध्ये सामील झाला रहाणे, सेहवागला पछाडत गेला पुढे

रहाणेला बाद करताच अँडरसनच्या नावे मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा बनला तिसरा वेगवान गोलंदाज

रिटायर झालोय, पण खेळ विसरलो नाहीत! युवराज-सचिन-युसूफची धुव्वाधार फलंदाजी, बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---