---Advertisement---

Singapore Open 2026: एचएस प्रणॉय ‘कमबॅक किंग’! जागतिक क्रमवारीतील 5 व्या क्रमांकाच्या क्रिस्टीला दिला पराभवाचा धक्का

On: बुधवार, मे 27, 2026 6:51 PM
---Advertisement---

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने बुधवारी (27 मे) सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जोनाथन क्रिस्टी याला पराभवाचा धक्का दिला. 2023 च्या जागतिक चॅम्पियनशीप आणि आशियाई खेळांमधील कांस्यपदक विजेता असलेल्या प्रणॉयने संयमी खेळ करत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या क्रिस्टीला 10-21, 21-12, 21-18 असे पराभूत केले आणि पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

प्रणॉयचा क्रिस्टीवरील पाच वर्षांतील पहिला विजय होता, यापूर्वी त्याने 2021 च्या इंडोनेशिया ओपनमध्ये त्याला पराभूत केले होते. भारताच्या 2022 च्या थॉमस कप विजयात आणि डेन्मार्कमधील अलीकडील कांस्यपदक विजयात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या प्रणॉयचा पुढील सामना सिंगापूरचा माजी विश्वविजेता लोह केन यू याच्याशी होईल.

3-7 अशा हेड टू हेड रेकॉर्डसह सामन्यात उतरलेल्या प्रणॉयला पहिल्याच गेममध्ये क्रिस्टीने सहज पराभूत करत आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत इंडोनेशियन खेळाडूने 11-5 अशी आघाडी घेतली आणि नंतर 16-9 अशी मजल मारली. त्याने सहज पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने लवकरच स्वत:ला सावरले आणि 11-7 अशी आघाडी घेतली. त्याने जोरदार पुनरागमन करत क्रिस्टीला कोणतीही संधी दिली नाही.

अंतिम गेम निर्णायक असल्याने तो रोमांचकच झाला. त्यामध्ये सुरुवातीला क्रिस्टी 6-3 असा आघाडीवर होता, मात्र प्रणॉयने बाजी पलटवली आणि 13-11 अशी आघाडी घेतली. काही वेळानंतर पुन्हा क्रिस्टीने 18-16 अशी आघाडी घेतली होती, पण प्रणॉयने सुरेख खेळ करत शेवटचे पाच गुण जिंकले आणि विजय मिळवला. सध्या प्रणॉय जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी आहे.

या स्पर्धेत आज भारताची कामगिरी संमिश्र राहिली. मिश्र दुहेरी जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही आपले सामने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला, मात्र किदाम्बी श्रीकांत आणि मालविका बन्सोड यांना सलामीतच बाहेर पडावे लागले. कपिला-क्रास्टो यांनी मलेशियाच्या वोंग टिएन-लिव चिव सिएन यांचा 21-14, 20-22, 21-13 असा पराभव केला.

तसेच मंगळवारी (26 मे) पीव्ही सिंधू, चिराग शेट्टी-सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी आपापले गेम्स जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला, मात्र आयुष शेट्टी पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---