पुणे: गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर शुभम इरावाडकरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर आठ गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा अरण्येश्वर कॅम्पसमधील क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, पद्माकर पवार, डाॅ. नितीन पवार, प्राचार्य चंद्रकांत कटारीया उपस्थित होते. विजेत्यांना आणि उपविजेत्यांना करंडक आणि रोख बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंहगड कॉलेजच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून डी. वाय. पाटील संघाला निर्धारित सहा षटकांत ५ बाद ४९ धावांत रोखले. यात अयान यादवलाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्याने १७ चेंडूंत दोन चौकारांसह २० धावा केल्या. मयुर रेणके, केशव सुतार, पुरुषोत्तम यांनी अचूक मारा करून डी. वाय. पाटील संघाला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना केशव सुतार शून्यावर बाद झाला. मात्र, याचे दडपण न घेता शुभमने रोहित बोबडेच्या साथीने ४२ धावांची भागीदारी रचून संघाला विजयाच्या समीप पोहोचविले. विजयासाठी सात धावांची गरज असताना रोहित बाद झाला. यानंतर शुभमने पाचव्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. शुभमने २३ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद ३६ धावा केल्या.
धावफलक : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ५ बाद ४९ (अयान यादव २०, मयुर रेणके २-२५, केशव सुतार १-७, पुरुषोत्तम १-८) पराभूत वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ५ षटकांत २ बाद ५२ (शुभम इरावाडकर ३६, रोहित बोडके ११, वेदांत गिडये १-१६, अयान यादव १-२३).
मुलींमध्ये शिवाजी मराठा आर्किटेक्चर महाविद्यालयाला विजेतेपद
मुलींच्या गटात श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने (एसएसएमएस) अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३४ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. एसएसएमएस कॉलेजने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. यात प्रेरणा पवारने १९ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह नाबाद ४४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अनंतराव पवार कॉलेजला ३ बाद ४१ धावाच करता आल्या. धावफलक : एसएसएमएस – ५ षटकांत १ बाद ७५ (प्रेरणा पवार नाबाद ४४, रिया इंदलकर नाबाद १०, प्रणाली गुरव १-२०) वि. वि. अनंतराव पवार कॉलेज – ५ षटकांत ३ बाद ४१ (प्रणाली गुरव नाबाद १८, अक्षदा गायकवाड १६, तेजश्री पाटील २-१४, हर्षा अडके १-५).
(Sinhagad College bagged the title in Inter-college Shri Shivaji Maratha Architecture Cricket Tournament)