टीम इंडियाला (Team india) 224 धावांवर गारद केल्यानंतर इंग्लंड संघाने ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात आक्रमक सुरुवात केली. झॅक क्रॉली (Jack Krauli) आणि बेन डकेट (Ben Duckket) या सलामी जोडीने पहिल्या 15 षटकांत भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. अवघ्या 12.5 षटकांत या दोघांनी मिळून 92 धावा ठोकल्या. डकेटला आकाशदीपने बाद केलं, तर क्रॉलीला प्रसिद्ध कृष्णाने माघारी धाडलं.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार ओली पोप (Ollie Pope) खेळपट्टीवर स्थिर होण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने 22 धावा देखील पूर्ण केल्या होत्या. पण, त्याच वेळी मोहम्मद सिराजच्या (Mohmmed Siraj) हातून सुटलेल्या एका ‘जादुई चेंडू’ने पोपचा आत्मविश्वास ढासळवला. चेंडू टाकल्यानंतर पिचवर पडून असा काही वळण घेतलं की पोप फक्त सिराजकडे पाहत राहिला.
हा चेंडू 25व्या षटकातील 5वा चेंडू होता. तो सुरुवातीला ऑफ स्टंपच्या बाहेर पडला, पण लगेचच दिशा बदलत आत वळला आणि थेट पोपच्या पॅडवर लागला. सिराज आणि टीम इंडियाने जोरदार अपील केली, पण मैदानी पंचाने ‘नॉट आऊट’चा निर्णय दिला. त्यानंतर थोड्या विचारमंथनानंतर कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला. रिव्ह्यू टीम इंडियाच्या बाजूने गेला आणि बॉल मिडल स्टंपवर लागला असता, हे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला आणि पोप 22 धावांवर माघारी परतला.
या विकेटसह मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 200 विकेट्स पूर्ण केल्या. यामध्ये त्याने सर्वाधिक 115 विकेट्स कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. वनडे मध्ये त्याच्या नावावर 71, तर टी-20 मध्ये 14 विकेट्स आहेत.






