जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने शुक्रवार (16 एप्रिल) रोजी आयपीयलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून 200 वा सामना खेळला. आयपीएल 2021 च्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात जेव्हा तो नाणेफेकीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याने हा कारनामा केला. यावर सामन्यानंतर त्याला विचारले असता तो हसला आणि म्हणाला की, आता खूप वयस्कर झाल्याचे जाणवते.
मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर त्याने तीन वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या चेन्नई संघासाठी 200 वा सामना खेळला. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
धोनीला या सामन्यानंतर कोणत्याही एका संघासाठीसाठी 200 सामने खेळून कसे वाटत आहे? असे विचारले असता त्याने हसत म्हटले की ”मला आता मी खूप वयस्कर झालो आहे असे वाटते. हा खूप लांब प्रवास झाला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या देशात यामध्ये दक्षिण आफ्रिकेत, भारतात आणि यूएईमध्येही खेळल्या गेलेल्या लीगचा प्रवास खूपच विशेष होता.”
पुढे तो म्हणाला की, “मला वाटते की 2011 सालच्या चेन्नईच्या खेळपट्टीवर आम्ही खूप खूष होतो. परंतु त्यानंतर या मैदानावर काम करणाऱ्या ग्राउंड्समननी कठोर परिश्रम केले. पण आम्ही या मैदानावर कधीच खूष राहिलो नाही. कारण यावर चेंडू कधीच बॅटवर येत नाही. परंतु मुंबईची खेळपट्टी अतिशय नेत्रदीपक असून यावर धावाही बऱ्याच करता येतात.” तसेच या सामन्यात 4 षटकांत 13 धावा देऊन 4 बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज दीपक चाहरचेही त्याने कौतुक केले.
धोनीचे सीएसकेकडून सामन्यांचे ‘द्विशतक’
धोनीने 200 सामन्यांपैकी फक्त एक सामना सोडला, इतर सर्व सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. 2012 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीग सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, परंतु त्यावेळी त्याने संघाचे नेतृत्व केले नव्हते.
इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याने सीएसकेसाठी 176 सामने तर चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या 24 सामने त्याने सीएसके संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. धोनीने 2016-17 च्या हंगामात 30 आयपीएल सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. आत्तापर्यत सीएसकेने त्याच्या नेतृत्वात तीन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.
आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत 206 सामन्यांत 40.63 च्या सरासरीने 4632 धावा केल्या असून त्यामध्ये 23 अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच त्याचा आयपीएलमधील स्ट्राइक रेटही 136 पेक्षा जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेने सामना जिंकला, पण अंबाती रायुडूच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम
…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या!
वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी