---Advertisement---

SL vs IND 3rd ODI: गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर फर्नांडो, राजपक्षने अर्धशतकांसह साकारला श्रीलंकेचा विजय; पण मालिका भारताच्या खिशात

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 11:38 PM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना झाला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने ३ विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील व्हाईटवॉश टाळला. भारताला तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्ष या दोन फलंदाजांनी अर्धशतक केले, तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव ४३.१ षटकात २२५ धावांवर संपुष्टात आला. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार श्रीलंकेसमोर ४७ षटकात २२७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान श्रीलंकेने ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३९ षटकात पूर्ण केले.

श्रीलंकेकडून २२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका आले. त्यांनी सुरुवात तर चांगली केली होती. मात्र, मिनोद ७ धावांवर कृष्णप्पा गॉथम विरुद्ध खेळताना बाद झाला. पण यानंतर फर्नांडोने राजपक्षबरोबर दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके केली. याबरोबरच या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी तोडण्याच चेतन साकारियाला यश आले. त्याने राजपक्षला कृष्णप्पा गॉथमच्या हातून झेलबाद केले. राजपक्षने ५६ चेंडूत १२ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर धनंजय डी सिल्वा(२) आणि दसून शनका(०) यांनी झटपट विकेट गमावल्या. तर चरिथ असलंका २४ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताच्या सामन्यातील पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारताला या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा सर्वाधिक फटका बसला.

पाच विकेट्स गेल्यानंतर फर्नांडोने रमेश मेंडिसला साथीला घेत श्रीलंकेचा डाव पुढे नेला. पण श्रीलंका विजयाच्या अगदी समीप असताना फर्नांडो राहुल चाहरच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉकडे झेल देऊन ७६ धावांवर बाद झाला. ९८ चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. तो बाद झाल्यानंतर चमिका करुणारत्ने केवळ ३ धावांवर राहुल चाहरविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाला.  अखेर रमेश मेंडिस आणि अकिला धनंजय यांनी ३९ षटकात श्रीलंकेचा विजय साकार केला.

भारताकडून राहुल चाहरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर चेतन साकारियाने २ विकेट्स घेतल्या. तसेच कृष्णप्पा गॉथम आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताची फलंदाजी ढेपाळली

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी जोडी उतरली होती. त्यांनी भारताला चांगली सुरुवात दिली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही कर्णधार शिखरने केवळ १३ धावांवर तिसऱ्या षटकात दुशमंत चमिरा विरुद्ध खेळताना विकेट गमावली. पण त्यानंतर शॉने पदार्पणवीर संजू सॅमसनला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी भारताला १०० धावांचा आकडा पार करुन दिला.

मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच शॉला श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने ४९ धावांवर पायचीत केले. शॉचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. तो सॅमसनसह ७४ धावांची भागीदारी करुन १६ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच सॅमसनही १९ व्या षटकात प्रविण जयविक्रमाविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. त्याचा ४६ धावांवर एक्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अविष्का फर्नांडोने झेल घेतला. सॅमसनचेही अर्धशतक थोडक्यात हुकले.

यानंतर मनिष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला होता. मात्र, २३ व्या षटकादरम्यान पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सामना थांबवण्यात आला. सामना थांबला तेव्हा भारताच्या २३ षटकात ३ बाद १४७ धावा झाल्या होत्या.

त्यानंतर काही वेळाने पाऊस थांबल्याने पुन्हा सामन्याला सुरुवात झाला. पावसामुळे काही वेळ वाया गेलेला असल्याने सामन्यांतील षटके कमी करण्यात आली. दोन्ही संघ प्रत्येकी ४७ षटके खेळतील, असा निर्णय घेण्यात आला.

पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर मात्र, भारताची फलंदाजी ढेपाळली. मनिष पांडे ११, हार्दिक पंड्या १९, नितीश राणा ७, कृष्णप्पा गॉथम २, राहुल चाहर १३ आणि नवदीप सैनी १५ धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव ४३.१ षटकांत केवळ २२५ धावांवर संपुष्टात आला.

श्रीलंकेकडून अकिला धनंजय आणि प्रविण जयविक्रमने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच दुशमंत चमिराने २ विकेट्स घेतल्या, तर दसून शनका आणि चमिका करुणारत्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताकडून ५ खेळाडूंचे पदार्पण

या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात तब्बल ६ बदल झाले आहेत. भारताकडून ५ खेळाडू वनडे पदार्पण करत आहेत. यामध्ये संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णप्पा गॉथम आणि राहुल चाहर यांचा समावेश आहे. तसेच या सामन्यासाठी नवदीप सैनीलाही अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाली आहे.

तसेच श्रीलंका संघाचा प्रमुख गोलंदाज वनिंदू हसरंगा या सामन्याला पायाच्या दुखापतीमुळे मुकणार आहे. श्रीलंकेने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात ३ बदल केले आहेत. प्रवीण जयविक्रम, अकिला धनंजय आणि रमेश मेंडिस यांना या सामन्यासाठी श्रीलंकेच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारत – पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गॉथम, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.

श्रीलंका – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), भानुका राजपक्ष, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, अकिला धनंजय, दुशमंत चमीरा, प्रवीण जयविक्रम.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---