मागील काही महिन्यांपासून भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चिंताजनक राहिली आहे. संघाने गेल्या दोन वर्षांत मायदेशात दोन मोठ्या मालिका गमावल्या. आता संघासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गॉलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताला दोन खेळाडूंचा अधिक अडथळा असणार आहे. ते पार केले की भारताचा विजय निश्चित आहे.
यजमान संघ म्हणून श्रीलंका भारताला चांगलीच स्पर्धा देऊ शकते. त्यात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान विकेटकीपर-फलंदाज दिनेश चंडीमल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या यांचे असणार आहे. श्रीलंकेच्या यशामध्ये हे दोघे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भारताने त्यांचा अडथळा पार केला, तर विजय सूकर होईल.
दोघांची, चंडीमल आणि जयसूर्याची कामगिरी गॉलमध्ये उत्तम राहिली आहे. श्रीलंकेसाठी दीर्घकाळ विकेटकीपींग केल्यानंतर चंडीमल आता अधिक वेळा केवळ फलंदाज म्हणून खेळतो. तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याने गॉल येथे 44 डावांमध्ये खेळताना सहा शतके आणि 10 अर्धशतके केली आहे. त्याने 55 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत.
वयाच्या 30 व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या जयसूर्याने त्याच्या कामगिरीमध्ये सातत्या राखले आहे. त्याची गॉलमधील आकडेवारी जबरदस्त आहे. त्याने गॉलमध्ये केवळ 11 सामने खेळले आणि 81 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यामध्ये त्याने नऊ वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 125 विकेट्स घेतल्या असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक विकेट्स गॉलमध्येच घेतल्या. यावरून त्याची या मैदानावरील दहशत दिसून येते.
भारताविरुद्ध चंडीमल-जयसूर्याची कामगिरी कशी?
चंडीमलला भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे, मात्र जयसूर्या अद्याप भारताविरुद्ध खेळलेला नाही. चंडीमलने भारताविरुद्ध 8 कसोटी सामने खेळताना दोन शतके आणि तीन अर्धशतकांच्या सहाय्याने 750 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी 50 राहिली. यावरून तो पुन्हा एकदा भारताला आव्हान देण्यास तयार आहे.
भारताने जयसूर्याचा सामना केला नाही, मात्र तो पाहुण्या संघाला आपल्या फिरकीने त्रास देण्यास सज्ज आहे. भारताने या दोघांचा नीट सामना केला, तर विजय निश्चित आहे. (SL vs IND Test series Dinesh Chandimal and Prabath Jayasuriya record at Galle Stadium)






