भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये ऐतिहासिक दिवस-रात्र क्रिकेट सामन्याला गुरुवारपासून (३० सप्टेंबर) प्रारंभ झाला आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशी ( १ ऑक्टोबर) देखील भारतीय फलंदाजांचा बोलबाला सुरू आहे. शेफाली वर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर, स्म्रीती मंधनाने टिच्चून फलंदाजी केली आणि दुसऱ्या दिवशी जोरदार शतक झळकावले. त्यामुळे तिने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावलेले हे शतक स्म्रीती मंधनाच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. तसेच शतक झळकावताच तिने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीनंतर दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी स्म्रीती मंधना दुसरीच भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. विराट कोहलीने हा कारनामा २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत केला होता. कोहलीने कोलकाताच्या मैदानावर दिवस रात्र कसोटी सामन्यात १३६ धावांची तुफानी खेळी केली होती.
स्म्रीती मंधनाने या सामन्यातील पहिल्या दिवशी (३० सप्टेंबर) तुफान फटकेबाजी करत, ५१ चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या साहाय्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर डार्सी ब्राऊनच्या एकाच षटकात तिने ४ चौकार मारले होते. शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधनाने मिळून भारतीय संघाला ९३ धावांची जोरदार सुरुवात करून दिली होती. परंतु, शेफाली वर्मा मोठी खेळी करी शकली नाही. ती ३१ धावा करत माघारी परतली.
वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्म्रीती मंधनाने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले होते. हा कारनामा तिने २०१४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत केला होता. त्यानंतर सलग ७ वर्ष भारतीय महिला संघाला कसोटी क्रिकेट खेळण्यची संधी मिळाली नव्हती. दरम्यान याच वर्षी ७ वर्षानंतर भारतीय महिला संघाला इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत ब्रिस्टलच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात ७८ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“धोनीने ज्याप्रकारे विजयी षटकार मारला, त्यामुळे विरोधी संघांनी आता घाबरले पाहिजे”
‘हे’ आहे चेन्नईच्या यशाचे प्रमुख कारण; वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा
आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी हर्षलला चालावी लागणार केवळ सात पाऊले