महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत सातव्यांदा आशिया चषक उंचावला. अंतिम सामन्यात केवळ 66 धावांचा पाठलाग करताना संघाची उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद अर्धशतकी खेळी केली. आपल्या याच शानदार खेळी दरम्यान तीने भारताची सर्वकालीन महान महिला क्रिकेटपटू मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.
स्मृतीने या सामन्यात भारतीय संघासाठी सलामीला येताना आक्रमक फटकेबाजी केली. केवळ 25 चेंडूवर अर्धशतक पूर्ण करत तिने भारतासाठी महिला क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. अखेरपर्यंत नाबाद राहत तीने 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तिचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 18 वे अर्धशतक ठरले.
आपल्या याच अर्धशतकानंतर तिने भारताची माजी कर्णधार मिताल राज हिचा भारतासाठीचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मागे सोडला. मितालीने भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये 17 अर्धशतके ठोकली होती. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाची विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. हरमनप्रीतने आपल्या आतापर्यंतच्या टी20 कारकिर्दीत 9 अर्धशतके ठोकलीत. या यादीमध्ये भारताची दुसरी युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज 9 अर्धशतकांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर उभी आहे.
या अंतिम सामन्याचा विचार केला गेला तर भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या संघाचा निभाव लागला नाही. रेणुका ठाकूर, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी श्रीलंकेचा डाव केवळ 65 धावांवर गुंडाळला. या धावांचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांचे बळी गमावत विजयी लक्ष पूर्ण केले. रेणुका ठाकूर हिला सामनावीर तर, संपूर्ण स्पर्धेत शानदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मा तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार दिला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा डॉन भारतच! आतापर्यंत खेळलेल्या हंगामात विरोधी संघाना चारली धूळ, आकडेवारी पाहाच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन हुशार आशियाई कर्णधार, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी दिले अमूल्य योगदान






