बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच महिला क्रिकेटपटूंसाठी वार्षिक कराराची घोषणा केली होती. या यादीमध्ये पहिल्या श्रेणीतील क्रिकेटपटूंना ५० लाखांची रक्कम मिळणार असून ही पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेच्या तुलनेत खूप कमी आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते की, महिला क्रिकेटपटू आणि पुरुष क्रिकेटपटूमध्ये भेदभाव का? यावर भारतीय महिला संघातील फलंदाज स्म्रीती मंधनाने आपले मत मांडले आहे.
ए प्लस श्रेणीतील पुरुष क्रिकेटपटूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. यानंतर ए श्रेणीमध्ये असलेल्या खेळाडूंना ५ कोटी, बी श्रेणीमधील खेळाडूंना ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी मिळतात. म्हणजे सी श्रेणीत येणाऱ्या पुरुष खेळाडूंनासुद्धा ए श्रेणीमध्ये असलेल्या महिला क्रिकेटपटूंपेक्षा जास्त मानधन मिळते.
याबाबत बोलताना भारतीय महिला संघातील फलंदाज स्म्रीती मंधाना म्हणाली, “आम्हाला हे समजणे आवश्यक आहे की आम्हाला मिळणारा महसूल पुरुषांच्या क्रिकेटमधूनच मिळत आहे. ज्यादिवशी महिला क्रिकेट सामन्यांद्वारेही मुबलक कमाई सुरू होईल. तेव्हा मी म्हणेन की आम्हाला सुद्धा समान हक्क हवे आहेत. पण आत्ता आपण असे म्हणू शकत नाही.”
काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीत १९ महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. भारतीय महिला खेळाडूंच्या नव्या वार्षिक करारामधील सहभागी खेळाडूंची संख्याही कमी करण्यात आली आहे. गतवर्षी २२ खेळाडूंना हा करार मिळाला होता. यात अ श्रेणी ३, ब श्रेणीमध्ये १० आणि क श्रेणीमध्ये ६ खेळाडू आहेत. अ श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाचे ५० लाख, ब श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाचे ३० लाख आणि क श्रेणीच्या खेळाडूंना १० लाख रुपये दिले जाणार आहेत.
अ श्रेणीमध्ये टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधाना आणि पुनम यादव यांना स्थान मिळाले आहे. तर ब श्रेणीमध्ये वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा समावेश आहे. तसेच क श्रेणीमध्ये मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि रीचा घोष यांना स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल स्थगितीमुळे नाराज लोक थेट ‘इंडियन आयडॉल’ शोवर काढतायेत राग; होस्ट आदित्यचा खुलासा
कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण