भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत मंधानानं सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना 217 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या खेळीदरम्यान मंधानान एक मोठा विश्वविक्रमही रचला. आता ती टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. तिच्या या रेकॉर्डबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मंधानानं तिच्या 47 चेंडूत 77 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि एक षटकार लगावला. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करण्याची ही तिची 30वी वेळ होती. आता ती आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे.
या बाबतीत मंधानानं न्यूझीलंडची दिग्गज फलंदाज सुझी बेट्सचा विश्वविक्रम मोडला. न्यूझीलंडच्या 37 वर्षीय बेट्सनं टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 29 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावांची इनिंग खेळली आहे. तिनं आपल्या कारकिर्दीत 28 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं. तर मंधानानं आतापर्यंत एकही शतक झळकावलेलं नाही. तिची टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या 87 आहे.
स्मृती मंधानानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 सामन्यात सुमारे 30च्या सरासरीनं 3761 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये ती सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज आहे. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 123.27 राहिला. या बाबतीत तिनं भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवर मोठी आघाडी घेतली आहे.
हरमनप्रीतनं भारतासाठी खेळलेल्या 178 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.17 च्या सरासरीनं 3589 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 108 राहिला. या फॉरमॅटमध्ये तिनं एक शतक आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत. एकूणच, मंधाना ही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये बेट्सनं सर्वाधिक धावा केल्या आहेत, जिच्या नावे 171 सामन्यात 30 च्या सरासरीनं 4584 धावा आहेत.
हेही वाचा –
“विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा
हेड कोच गंभीरमुळे अश्विनने अचानक निवृत्ती घेतली? या 6 मुद्द्यांनी समजून घ्या पडद्यामागची संपूर्ण कहानी
“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य