सध्या भारत आणि आयर्लंडच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (15 जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. भारतीय संघानं पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही मोडला. भारतासाठी स्टार फलंदाज स्मृती मंधानानं आपला फॉर्म कायम ठेवत धडाकेबाज शतक झळकावलं. तिच्याशिवाय प्रतिका रावलनं (154) देखील शतकी खेळी केली. स्मृती मंधानानं अवघ्या 80 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावा केल्या. आपल्या या खेळीत तिनं 5 मोठे विक्रमही केले. या विक्रमांबद्दल आपण या बातमीत जाणून घेऊया.
(5) भारतीय महिला संघासाठी १०० पेक्षा जास्त डावांमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट – स्मृती मंधानानं आयर्लंडविरुद्धच्या शतकादरम्यान 168.75 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. 100 किंवा त्याहून अधिक धावांच्या खेळीदरम्यान भारतीय महिला संघाच्या कोणत्याही फलंदाजानं नोंदवलेला हा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे.
(4) भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार – स्मृती मंधानाच्या नावावर आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 52 षटकार झाले आहेत. तिनं या बाबतीत हरमनप्रीत कौरची बरोबरी केली, जी टीम इंडियासाठी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.
(3) भारतीय महिला फलंदाजाद्वारे एका वनडे डावात सर्वाधिक षटकार – भारतासाठी एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत स्मृती मंधानानं हरमनप्रीत कौरची बरोबरी केली आहे. हरमननं 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 171 धावांच्या नाबाद खेळीत 7 षटकार मारले होते. आज मंधानानं आयर्लंडविरुद्ध तेवढेच षटकार मारून तिची बरोबरी केली.
(2) 10 एकदिवसीय शतकं मारणारी पहिली आशियाई खेळाडू – स्मृती मंधानाच्या कारकिर्दीतील हे 10वं एकदिवसीय शतक होतं. अशी कामगिरी करणारी ती भारतासह आशियातील पहिली फलंदाज आहे. तिच्यानंतर श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू दुसऱ्या स्थानावर आहे, जिनं 9 शतकं झळकावली आहेत.
(1) टीम इंडियासाठी सर्वात जलद एकदिवसीय शतक – स्मृती मंधानानं आयर्लंडविरुद्ध शतक करण्यासाठी फक्त 70 चेंडू घेतले. हे कोणत्याही भारतीय महिला फलंदाजाचं एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी हा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. तिनं गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत हा विक्रम केला होता.
हेही वाचा –
भारतीय महिला संघासाठी वनडे सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या 3 भागीदारी, मंधाना-प्रतीका अव्वलस्थानी
रेकाॅर्डब्रेक..! भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली
स्मृती मंधानाचं नाव इतिहासात अजरामर! भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड मोडला