भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला बीसीसीआयने 2023-24 साठी महिला श्रेणीत सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले आहे. पुरस्कार म्हणून मानधनाला ट्रॉफी आणि 15 लाख रुपये मिळाले आहेत. मानधना मागील काही दिवसांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ती टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. ज्याचे तिला आता बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे तिने हा मोठा पुरस्कार चौथ्यांदा जिंकला आहे.
स्मृती मानधनाने 2024 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 747 धावा केल्या. ज्यात तिने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. तिने महिला एकदिवसीय स्वरूपात एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला आहे. गेल्या वर्षी तिने शंभराहून अधिक चौकार मारले. ज्यात 95 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. 28 वर्षीय मानधनाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.86 च्या सरासरीने आणि 95.89 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या कारणास्तव, तिला 2024 सालासाठी आयसीसी एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले.
स्मृती मानधना 2024 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने जगातील काही अव्वल संघांविरुद्ध उत्तम खेळी खेळल्या. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने सलग दोन शतके झळकावली. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यातही मानधनाने शतक ठोकले होते. नंतर डिसेंबरमध्ये पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने शतक झळकावले. पण भारताने सामना गमावला. जेव्हा स्मृती तिच्या लयीत असते तेव्हा तिला थांबवणे कठीण असते.
स्मृती मानधनाने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. तिने भारतासाठी 7 कसोटी सामन्यांमध्ये 629 धावा तर 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4209 धावा केल्या आहेत. याशिवाय तिच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3761 धावा आहेत. तिने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 10 शतके केली आहेत.