पुणे । सोनूकुमार गुप्ताच्या दमदार खेळाच्या जोरावर सार्थक कॉर्पोरेशन संघाने अॅमनोरा संघाला पराभूत करताना एएवायएस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलइडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सार्थक कॉर्पोरेशनच्या व्ही. मोहनरावला सर्वोत्तम बॅटर, सार्थक कॉर्पोरेशनच्याच दीपककुमारला सर्वोत्तम पिचर तर व्होटेक्सा बॅटरीज संघाच्या कल्पेश कोल्हेला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सार्थक कॉर्पोरेशन सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, नगरसेविका स्मिता वस्ते, जीएसटीचे सहाय्यक आयुक्त अविनाश चव्हाण, माजी आयकर अधिकारी नरेंद्र हसबनीस, एएवायएस सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे, सचिव राजेंद्र मिसाळ, अभिजित भदे, आयकर अधिकारी अजय परदेशी, नागेश पालकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अंतिम लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने अॅमनोरा संघाला १०-३ असे पराभूत केले. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून सोनुकुमार गुप्ताने ३, व्ही. मोहनराव व मानस केशरवानी यांनी प्रत्येकी २ तर दीपककुमार, आशिषकुमार व डी. रुद्रपती यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. अॅमनोरा संघाकडून नरेश निर्मळकर, कृष्णा महानंदा व चंदर तांडी यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना चांगली लढत दिली.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये व्होटेक्सा बॅटरीज संघाने रचना लाईफस्टाईल संघाला ४-२ असे पराभूत केले. व्होटेक्सा बॅटरीज संघाकडून जयेश मोरे, मोहित पाटील, प्रीतीश पाटील, गौरव चौधरी यांनी प्रत्येकी १ होमरन्स केला. अक्षय कुडवे, सौरव ठोसे यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना रचना लाईफस्टाईल संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने व्होटेक्सा बॅटरीज संघाला ६-३ असे पराभूत करताना अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पी. आशिष, व्ही. मोहनराव, जितेंद्र, बी. रुआरापट्टी, मानस केशरीनमी, दीपक कुमार यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. व्होटेक्सा बॅटरीज संघाच्या जयेश मोरे, श्रीराम चौहान व कल्पेश कोल्हे यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना दिलेली लढत अपुरी ठरली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अॅमनोरा संघाने रचना लाईफस्टाईल संघाला ६-३ असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अॅमनोरा संघाकडून हितेश निर्मळकर, नरेश निर्मळकर, बीरु बाघ, शंभू महानंद, सौरभ यादव व मोहित ठाकूर यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अभिजित इंगोले, अक्षय कुडवे व प्रतिक डुकरे यांनी प्रत्येकी १ होमरन्स करताना चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.