भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आगामी जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिका खेळणे प्रस्तावित आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावात ही मालिका खेळवली जाईल की नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. मालिकेला आणखी दीड महिन्याचा अवकाश शिल्लक असताना खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काही खेळाडूंनी तर निवृत्तीची धमकी बोर्डाला दिलेले दिसून येते. या नव्या वादाचे कारण अंक आधारित ग्रेडिंग सिस्टीम आहे. याद्वारे खेळाडूंच्या वार्षिक कमाईचे आकलन केले जाते.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंची आहे मागणी
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंची मागणी आहे की, ही नवीन ग्रेडिंग सिस्टीम अधिक पारदर्शी बनविण्यात यावी आणि ग्रेडच्या आधारे त्यांना कसे गुण देण्यात येतील हे सांगावे. कारण, याचा थेट परिणाम खेळाडूंच्या उत्पन्नावर होईल. नवीन प्रणालीनुसार, खेळाडूंना चार वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहे.
यामध्ये त्यांची फिटनेस पातळी, शिस्त, नेतृत्व क्षमता, संघासाठी त्यांचे एकूण योगदान आणि गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय व घरगुती क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे गुण देण्यात येतील. फक्त यासाठी गुणांचे वाटप कसे केले जाईल हे बोर्डानं स्पष्ट करावे. जेणेकरुन त्यांना संपूर्ण प्रक्रिया अधिक बारकाईने समजू शकेल आणि ज्या क्षेत्रात त्यांची कमतरता आहे अशा क्षेत्रांमध्ये सुधारणा करता येईल. दरम्यान, बोर्डाला निवृत्तीची धमकी दिलेल्या खेळाडूंची नावे अद्याप समोर आली नाहीत.
आम्ही या प्रक्रियेचा भाग होऊ इच्छितो
श्रीलंकेतील एका प्रमुख वृत्तपत्राच्या बातमीनुसार, कराराच्या वाटाघाटीतील खेळाडूंचे प्रतिनिधी निशान यांच्या म्हणण्यानुसार,
“प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे की अंक कशाप्रकारे दिले जातात याचा भाग आम्हाला केले पाहिजे. पारदर्शकतेमुळे एकजुटता वाढते आणि संघातील वातावरण चांगले राहते. याप्रकरणी सर्व खेळाडू एकजूट आहेत.”
दुसरीकडे, श्रीलंका क्रिकेट मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य एश्ले डिसोजा यांनी सांगितले की, “खेळाडूंच्या मागणीनुसार या नव्या पद्धतीवर संशोधन पुन्हा सुरू केले गेले आहे. या संपूर्ण प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आम्ही खेळाडूंशी याबाबत चर्चा करू. सध्या कोणत्याही खेळाडूला असे सांगण्यात आले नाही की या करारावर स्वाक्षरी करा.”
मागील काही काळापासून श्रीलंका क्रिकेट बोर्ड व श्रीलंकन क्रिकेटपटूंच्या दरम्यान थोडा थोडा वाद निर्माण होत आहे. श्रीलंकेचा सर्वात अनुभवी अष्टपैलू थिसारा परेरा यानेदेखील अकाली निवृत्ती जाहीर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी बेनक्रॉफ्टच्या बाजूने’, बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूस भारतीय दिग्गजाचा पाठिंबा
एकेकाळी टीम इंडियातून बाहेर झालेला क्रिकेटर म्हणतोय, ‘मी कॅलिस किंवा वॉटसनसारखा अष्टपैलू बनू शकतो’
‘नॅशनल क्रश’ रश्मिका विराट-रोहित नव्हे ‘या’ क्रिकेटपटूची आहे जबराट फॅन, नाव आहे तुमच्याही ओळखीचं