चटगाव मध्ये झालेल्या बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बांग्लादेश संघाचा दारुण पराभव केला होता. या सामन्यात बांग्लादेश संघाने विंडीज संघासमोर ३९५ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीज संघाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या काईल मेयर्स याने दुहेरी शतक झळकावत सामना विंडीज संघाला जिंकवून दिला होता.
याच सामन्यात बांग्लादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन डाव्या मांडीतील स्नायू खेचले गेल्यामुळे दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात तो गोलंदाजी करण्यासाठी परतला नव्हता. विंडीज संघ या मालिकेत १-० ने पुढे आहे. अशातच बांग्लादेश संघासाठी वाईट बातमी आली आहे. शाकीब अल हसन दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर झाला आहे.
सौम्य सरकार याला संघात स्थान
पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या शाकीब अल हसनच्या जागी सौम्य सरकार याला संघात स्थान देण्यात आले आहे. सौम्य सरकार याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एकूण १५ कसोटी सामने खेळले आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
सौम्य सरकारने शेवटचा कसोटी सामना २०१९ मध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळला होता. येत्या ११ फेब्रुवारी पासून वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळला जाणार आहे. संघातील मुख्य खेळाडू बाहेर असल्यामुळे बांग्लादेश संघाला त्याची नक्कीच कमतरता जाणवेल.
शाकीब अल हसन न्यूझीलंड दौऱ्यासाठी उपलब्ध नसणार
शाकीब अल हसनने यापूर्वीच बांग्लादेश क्रिकेट संघाला अर्ज केला होता की, न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात निवड केली जाऊ नये. शाकीबअल हसन याने आपल्या तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठी पितृत्व रजेसाठी बांग्लादेश क्रिकेट संघाला पत्र लिहिले होते. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यातही संघाचा भाग नसेल.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण






