भारतीय लोकांसाठी बॉलीवूड आणि क्रिकेट हे दोन अतिशय जिव्हाळ्याचे विषय असतात. भारतीय जनमानस भावनाशील पद्धतीने या दोन्ही क्षेत्रांकडे पाहत असते. या दोन्ही क्षेत्रांतील लोकांना भारतात प्रचंड प्रेम मिळते, मात्र त्याचबरोबर अनकेदा कडव्या टीकेलाही सामोरे जावे लागते. परंतु, जेव्हा या दोन क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असल्याची कुणकुण लागते, तेव्हा तो विषय देशव्यापी चर्चेचा ठरतो. विराट कोहली-अनुष्का शर्मा हे अशा यादीतील ताजे उदाहरण. यापूर्वी देखील अशा अनेक जोड्यांच्या चर्चा झाल्या होत्या. युवराज सिंग-किम शर्मा, रवी शास्त्री-अमृता सिंग अशा अनेक जोड्यांची प्रेमप्रकरणे याआधी गाजली होती. त्यातीलच एक जोडी म्हणजे सौरव गांगुली-नगमा! या लेखात आपण याच जोडीबद्दल जाणून घेणार आहोत!
नगमा ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री होती. अवघ्या १५व्या वर्षी तिने हिट चित्रपट दिले होते. हिंदी तसेच तमिळ चित्रपटात ती सातत्याने आपला ठसा उमटवत होती. कुंवारा, चल मेरे भाई, सुहाग हे तिचे चित्रपट गाजले होते. त्याचवेळी दुसरीकडे भारतीय क्रिकेट क्षितिजावर सौरव गांगुलीचा उदय होत होता. पदार्पणातच इंग्लंड दौऱ्यात ठसा उमटवल्यानंतर गांगुलीने मागे वळून पहिलेच नाही. त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे मॅच फिक्सिंगच्या भारतीय क्रिकेट इतिहासातील काळ्या अध्यायानंतर भारतीय संघाची कमान बंगालच्या या ‘प्रिन्स’कडे सोपवण्यात आली. त्याच्या कर्णधारपादाखाली नव्या दमाचा भारतीय संघ जागतिक पटलावर आपले अस्तित्व निर्माण करत होता.
याच दरम्यान २००१ साली गांगुली आणि नगमाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोर धरू लागली. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले होते. विशेष म्हणजे गांगुलीने १९९७ सालीच डोना रॉयशी विवाह केला होता. मात्र असे असतानाही गांगुली नगमाच्या प्रेमात असल्याचे वृत्त त्याकाळी अनेक माध्यमांनी दिले होते. इतकेच नव्हे तर नगमाला गांगुलीशी लग्न देखील करायचे होते, मात्र डोना कायदेशीर मार्गांचा वापर करून गांगुलीला अडकविण्याची भीती तिला होती, अशी माहिती काही सूत्रांनी दिली होती. या दोघांना एकमेकांबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले, मात्र या दोघांनीही जाहीरपणे आपले नाते कधीच मान्य केले नाही. परंतु, एका मुलाखतीत बोलताना नगमाने ‘जर आम्ही एकमेकांच्या आयुष्यातील अस्तित्व नाकारत नसू तर कोण काय म्हणतो याने फरक पडत नाही’, असे विधान करत एकप्रकारे नात्याची कबुलीच दिली होती.
मात्र काही काळानंतर जशी जशी गांगुलीच्या आणि भारतीय संघाच्या कामगिरीत घसरण होऊ लागली, तसे तसे या नात्यालाही ग्रहण लागायला लागले. गांगुलीच्या घसरत्या प्रदर्शनाला नगमाला जबाबदार ठरविण्यात येऊ लागले. इतकेच नव्हे तर त्या काळी भारतीय संघ जेव्हा जेव्हा पराभव पत्करत असे त्या त्या वेळी नगमाच्या माथ्यावर त्याचा दोष ठेवला जाई. या सगळ्याची परिणिती म्हणून २००२ साली गांगुली आणि नगमाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना नगमाने म्हटले होते, “ज्यावेळी तुमचे नाते एकमेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याऐवजी एकमेकांच्या अपयशाला कारणीभूत ठरत असतात, तेव्हा वेगळे होणेच योग्य असते.”
या निर्णयानंतर नगमा आणि गांगुली दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले. गांगुलीने त्यांनतर आपली यशस्वी क्रिकेट कारकीर्द पूर्ण केली आणि त्यांनतर तो प्रशासकीय क्षेत्रात उतरला. आजघडीला गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवत आहे. तर दुसरीकडे नगमाने आपली चित्रपट कारकीर्द पूर्ण केल्यानंतर राजकारणात उडी घेतली. सध्या ती अखिल भारतीय महिला कॉंग्रेसची महासचिव म्हणून काम पाहते आहे.